Join us

मेळघाटातील विद्यार्थ्यांची अनोखी बीजबँक, शंभरहून अधिक देशी प्रजातीचे जतन 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 6:47 PM

मेळघाटातील दुर्गम भागात असलेल्या जैतादही येथील विद्यार्थ्यांनी अनोखी बीजबैंक तयार केली आहे.

अमरावती :  मेळघाटातील दुर्गम भागात असलेल्या जैतादही येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनोखी बीजबैंक तयार केली आहे. हे गाव जंगलात असल्याने शिक्षकांसोबत भटकंती करून मुले बिया गोळा करतात. त्या माध्यमातून शाळेच्या नर्सरीतून वर्षाला एक हजार रोपे तयार होतात. विद्यार्थ्यांना ज्ञानदान, समाजभान देण्यासोबतच आत्मनिर्भर करणाऱ्या या शाळेला राज्यभरातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. 

मेळघाटात जैवविविधता विपुल असली तरी वृक्षांच्या काही प्रजाती विलुप्त होत आहेत. त्यांचे जतन, संवर्धन आणि बीज प्रसार करून त्या जगविणे आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्याकरिता रानोरानी, गावोगावी फिरून बीज संकलन करण्याचे कार्य जैतादही आदिवासी विद्यार्थी शिक्षकांसोबत करीत आहेत. या कार्यात विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांनी वाहून घेतले आहे. शाळेने गोळा केलेल्या बियांपासून दरवर्षी एक हजार रोपांची नर्सरी तयार करून ती रोपे वितरित केली. राज्यभर बियांची आदान-प्रदानसुद्धा केली जाते. 

१०० देशी प्रजातींचे बीज

विद्यार्थ्यांनी जवळपास १०० प्रकारच्या प्रजातीचे बौज गोळा केले आहेत. त्यामध्ये भाज्यांचे विविध प्रकार, औषधी गुणधर्म असलेल्या अनेक दुर्मीळ वृक्षांच्या बिया गोळ्या केल्या आहेत. आलापल्ली, भामरागड येथील सामाजिक वनीकरणाला मिश्र नर्सरीकरिता शाळेने गोळा केलेल्या बिया पाठविल्या आहेत. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासह पर्यावरण रक्षणाचे धडेही शाळेकडून मिळत आहेत.

बीज बँक महत्वाची 

सद्यस्थितीत पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे शेतकरी वर्ग वळू लागला आहे. मात्र यासोबतच जुन्या पारंपरिक वाणांना जपणे देखील महत्वाचे झाले आहे. राज्याच्या अनेक भागात अशा प्रकारे बीज संवर्धन करण्याचे काम सुरु आहे. यानुसार वेगवेगळय़ा हंगामांतील विविध पारंपरिक पिकांच्या बिया गोळा केल्या जातात. या बिया बांबूच्या टोपल्यांमध्ये अथवा मातीच्या भांडय़ांत र्निजतुकीकरण करून साठवून ठेवल्या जातात. या संचयाला बीज बँक असे म्हटले जाते. ही पद्धत इतर अनेक संस्थांबरोबरच ‘बायफ’नेही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर विकसित केली आहे.  

टॅग्स :शेतीबँकपीकशेती क्षेत्रमेळघाट