Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बोगस खतांचा पुरवठा, कारवाई होऊनही बोगस खत पुन्हा मार्केटमध्ये, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 15:16 IST

Bogus Fertilizers : बनावट खतविक्री प्रकरणात यापूर्वी गुन्हे दाखल असूनही त्याच कंपनीचे खत पुन्हा बाजारात आल्याचे दिसते.

अहिल्यानगर : गुजरातसह सोलापूर, पुणे आणि नांदेड येथूून बोगस खते अहिल्यानगर जिल्ह्यात विक्रीसाठी आल्याची दोन प्रकरणे गत दहा दिवसांत उघडकीस आली आहेत. यातील काही कंपन्यांवर बनावट खतविक्री प्रकरणात यापूर्वी गुन्हे दाखल असूनही त्याच कंपनीचे खत पुन्हा बाजारात आल्याचे दिसते.

कोपरगावमध्ये गत ११ फेब्रुवारीला सोलापूरच्या महालक्ष्मी फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने २८.५० मेट्रिक टन बोगस खत मिळून आले. या खतांमध्ये आवश्यक घटकांची मात्रा ९५ टक्क्यांपेक्षा कमी आढळून आली. १७ फेब्रुवारीला ४७७ बनावट खतांच्या गोण्यांसह एक ट्रक कोपरगावमध्येच जप्त करण्यात आला. 

या ट्रकमध्ये सोलापूरच्या महालक्ष्मी फर्टिलायझर्ससह गुजरातच्या शुभम फर्टिलायझर्स, नांदेडची पारसेवार ॲग्रो आणि पुणे जिल्ह्यातील इंडिया फर्टिकेम कंपन्यांच्या खतांचा समावेश आहे. ही खते कोणाला विक्री करणार होते? याबाबत ट्रकचालकाकडे कागदपत्रे आढळून आली नाहीत. सध्या कृषी विभाग व पोलिसांनी हा साठा सील करून खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविले आहेत. पोलिस तपासांतून अधिकची माहिती समोर येईल.

कंपनीला अभय कुणाचे ?कोपरगावमध्ये ११ व १७ फेब्रुवारीला आढळून आलेल्या बनावट खत प्रकरणात सोलापूरच्या महालक्ष्मी फर्टिलायझर्स कंपनीचे नाव असल्याने त्या कंपनीवर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सोलापूरमध्येही या कंपनीवर पूर्वीच गुन्हा दाखल आहे. पूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतरही या कंपनीचे खत बाजारात विक्रीला कसे आले ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खते बोगस असल्याची कृषी विभागाला खात्री पटल्याने नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. संबंधित कंपन्यांवर कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जाईल. जिल्ह्यातील इतर तालुक्यांतदेखील बोगस खते आहेत का? याबाबत तपासणी सुरू आहे.- राहुल ढगे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक, कृषी विभाग, अहिल्यानगर

कारवाईचे पुढे काय होते ?फेब्रुवारी २०२५ मध्ये नेवासा तालुक्यात बनावट खत विक्री प्रकरणात एक गुन्हा दाखल झाला होता, तर ऑगस्ट महिन्यात श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांत बनावट खतविक्री प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुढे काय कारवाई केली हे समजू शकलेले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake fertilizer supply to farmers persists despite action; details inside.

Web Summary : A highly concerning situation unfolds in Ahilyanagar, with the discovery of fake fertilizers being sold. Despite previous legal actions against certain companies, their counterfeit products are resurfacing in the market, raising questions about accountability and the effectiveness of current measures. Police are investigating.
टॅग्स :खतेशेती क्षेत्रशेतीरब्बी हंगाम