Join us

Soybean, Cotton Yield : कापूस दीड, सोयाबीनला केवळ दोन क्विंटल उतारा; आर्थिक संकट कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:29 IST

Soybean, Cotton Yield : खरीप हंगाम अतिवृष्टीच्या तडाख्यात कोलमडला आहे. सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकांच्या उत्पादनात तब्बल ६० ते ७० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. एकरी फक्त दीड ते दोन क्विंटल उतारा मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Soybean, cotton yield)

अविनाश पाईकराव 

नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसाने आणि ढगाळ वातावरणामुळे हातातोंडाशी आलेले पीक शेतकऱ्यांच्या हातातून निसटले. (Soybean, Cotton Yield)

परिणामी, सोयाबीनचे एकरी उत्पादन केवळ दीड ते दोन क्विंटल, तर कापसाचे एक ते दोन क्विंटल एवढेच आले आहे. या अभूतपूर्व नुकसानीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला असून जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. (Soybean, Cotton Yield)

हमीभाव नावालाच

शासनाकडून घोषित केलेला हमीभाव हा केवळ कागदोपत्रीच राहिला आहे. सोयाबीनसाठी ५,३२८ रु./क्विंटल आणि कापसासाठी ८,११० रु./क्विंटल असा दर असला तरी, शासकीय खरेदी केंद्रांना मुहूर्त सापडलेला नाही.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी भावात माल विकावा लागला. अनेक ठिकाणी खरेदी प्रक्रिया आता ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

खर्च जास्त, उत्पन्न शून्य 

कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचा एकरी खर्च तब्बल २५ ते २७ हजार रुपयांपर्यंत गेला आहे.मशागत, बियाणे, फवारणी, निंदण, वेचणी, वाहतूक या सर्व टप्प्यांवर खर्च वाढला; पण उत्पन्नात घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे अधिकच वाढले आहे.

नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही

दोन एकरमध्ये सोयाबीन घेतले, पण एकरी फक्त दोन क्विंटलच आले. अपेक्षित १५ ते २० क्विंटलच्या जागी काहीच मिळाले नाही. नुकसानीचा एक रुपयाही खात्यावर जमा नाही. रब्बीची पेरणी कशी करू हा प्रश्न आहे.- चंद्रकांत डुकरे, पिंपळगाव गो.

उत्पादन इतके कमी झाले की लागवडखर्चही निघाला नाही. उलट खिशातूनच पाच हजार रुपये प्रति एकर अधिक खर्च झाले.- विठ्ठल खांडरे, सावरगाव मा.

दीड एकर कपाशीत केवळ दोन क्विंटल उत्पादन झाले. सात हजार भाव मिळाला, पण खर्चाच्या तुलनेत काहीच नाही.- चिमनाजी नरवाडे, गुंज.

साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीन 

जिल्ह्यात यंदा ७ लाख ५६ हजार ५१ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यापैकी ४ लाख ५५ हजार ८७१ हेक्टरवर सोयाबीन आणि १ लाख ९७ हजार ६४३ हेक्टरवर कापूस लागवड झाली होती.

मात्र, अतिवृष्टी आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे.

रब्बीकडे आशा; पण हातात पैसा नाही

खरीपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी आता रब्बी हंगामाकडे पाहत आहेत. पण खत, बियाणे आणि नांगरणीचा खर्च भागवण्यासाठी कर्जाचा आधार घ्यावा लागतोय.

सरकारकडून मिळणारी नुकसानभरपाई अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. त्यामुळे दिवाळी काळात त्यांच्या घरात अंधारच होता.

मदत कधी मिळणार?

पिकांचे नुकसान, खरेदीतील दिरंगाई आणि शासनाच्या अनुदानातील अडथळे या तिहेरी संकटामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. शासनाने तातडीने नुकसानभरपाईचे वितरण आणि खरेदी प्रक्रियेला गती देणे, ही काळाची गरज आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Bajarbhav : शेतमालाला भावाचा बसतोय फटका; दिवाळीनंतर बाजारात घसरण सुरूच वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Farmers Devastated: Low Yields of Cotton and Soybean Crops

Web Summary : Heavy rains in Nanded have devastated cotton and soybean crops, with yields drastically reduced. Farmers face financial ruin as promised government support remains elusive, forcing them to borrow for the next season.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनकापूसबाजारखरीपनांदेड