जळगाव : एक वर्षापूर्वी दळणाला (Pith Girni) १० रुपये पायली भाव होता. पण वाढती महागाई, होणारा मेन्टेनन्स, विजेचा वाढता दर यात बसत नसलेला मेळ यामुळे सध्या काही ठिकाणी १५ रुपये पायली तर काही ठिकाणी अद्यापही १० रुपये पायली दळणाला मोजावे लागत आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मात्र ग्राहकांना आजही दळण परवडत असल्याचे दिसून येते.
वीज दरात (Power Supply) वारंवार वाढ होत चालल्यामुळे धान्य दळणाच्या शुल्कात वाढ होत असल्याचे चित्र आहे. वीज दरात सातत्याने वाढ होत असताना पूर्वीच्या दरात धान्य दळण करून देणे अजिबात परवडणारे नाही. दुसरीकडे पीठगिरणी (Ata chakki) उद्योगाला वीजदराबाबतीत शासनाकडून कोणतीही सवलत दिली जात नाही.
पूर्वी अन्नधान्य स्वस्त किंवा घरचं असायचं आणि ते जात्यावर दळलं जायचे. त्याला फक्त मेहनत लागत होती. आधुनिक काळात यात खूप बदल होऊन विजेवरील पीठ गिरणी आल्या तेव्हा दहा पैसे पायली (साडे तीन किलो) या दराने धान्य दलून दिलं जायचं. जसजशी महागाई वाढत गेली तसतसे धान्याचे भाव वाढत गेले. परिणामी, पिठाच्या गिरणीवर दळणाचीही भाववाढ होत गेली.
धान्याचे भाव गगनालासर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना उपजिवीका करताना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या धान्याचे भाव गगनाला भिडत असताना सामान्य जनतेला त्याची झळ बसत आहे. कष्ट करून आणलेलं धान्य गिरणीतून दळण्यासाठीही १५ ते २० रुपये (५ किलो) एक पायलीसाठी पैसे मोजावे लागतात. यात प्रतिकिलो दर पाहिले तर गहू ४ रुपये किलो, ज्वारी/बाजरी ४ रुपये, डाळी ६ रुपये, तांदूळ ६ रुपये असे दर आहेत.
वीज महागली; गिरणीचा मेन्टेनन्स परवडेना...पिठाच्या गिरणीसाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. त्यातच विजेच्या दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे गिरणीचे मेन्टेनन्स यात ताळमेळ जुळत नसल्याने गिरणीचा धंदा करताना चालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आर्थिक गणित जुळवताना कसरत करावी लागत असल्याचे गिरणी चालकाचे म्हणणे आहे. शहरी भागात दळणाची दरवाढ झालेली असताना ग्रामीण भागात मात्र दळणाचे दर अद्यापही तीन रुपये किलो आहेत.
खेड्यापाड्यात घरगुती गिरणी तुरळक ठिकाणी आहेत. आम्ही दगडी जात्यावरच्या गिरणीलाच पसंती देत असून, आमच्या गावात १० रुपये पायलीप्रमाणे धान्य दळून मिळत आहे.- कामिनी विनोद पाटील, गृहिणी, सुलतानपूर, ता. शहादा.