Join us

Pik Vima Yojana : सुधारित पीक विमा योजनेत कोण, किती नुकसान भरपाई देईल? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:10 IST

Pik Vima Yojana : सदरची योजना पीक विमा कंपन्यांमार्फत (Pik Vima Company) सन २०२५-२६ या एक वर्षाकरीता ८०:११० कप व कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल.

Pik Vima Yojana : सदरची योजना ही एकूण १२ जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत (Pik Vima Company) सन २०२५-२६ या एक वर्षाकरीता ८०:११० कप व कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल. त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधीत विमा कंपनीवर राहणार आहे. 

विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समुहातील एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट (Bum Cost) नुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या ११० टक्के यापैकी जे जास्त असेल त्यापर्यंतचे दायित्व स्विकारतील. 

यापुढील दायित्व राज्य शासन स्विकारेल, आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरीत विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल.

पुढील उदाहरण पाहुयात...

जिल्हा समुहातील विमा संरक्षीत रक्कम १००० रुपये असून बर्न कॉस्ट १५ टक्के आहे; विमा कंपनीने दिलेला विमा हप्ता दर १० टक्के असून त्याप्रमाणे एकूण विमा हप्ता रक्कम १०० रुपये आहे; जमा विमा हप्त्याच्या ११० टक्के नुसार विमा कंपनीचे दायित्व रक्कम ११० रुपये राहील. विमा संरक्षीत रक्कमेवरील बर्न कॉस्ट १५ टक्के नुसार एकूण विमा हप्ता रक्कम १५० रुपये राहील. 

सदर बर्न कॉस्ट रकमेच्या ११० टक्के प्रमाणे विमा कंपनीचे दायित्व रक्कम १६५ रुपये राहील. योजनेच्या तरतुदीनुसार जमा विमा हप्त्याच्या ११० टक्के पेक्षा बर्न कॉस्ट नुसार ११० टक्के प्रमाणे येणारी रक्कम जास्त असल्याने विमा कंपनीचे जास्तीत जास्त दायित्व १६५ रुपये राहील. तसेच विमा कंपनीचा नफा मर्यादा जमा विमा हप्ताच्या २० टक्के प्रमाणे रक्कम २० रुपये राहील. 

सदर उदाहरणाच्या आधारे खालील परिस्थितीमध्ये विमा कंपनी व राज्य शासनाचे दायित्व व नफा रक्कम पुढीलप्रमाणे निश्चित होईल.

परिस्थिती-१ : जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई २०० रुपये असल्यास बर्न कॉस्ट नुसार ११० टक्के प्रमाणे विमा कंपनी १६५ रुपये नुकसान भरपाई अदा करेल व राज्य शासन ३५ रुपये नुकसान भरपाई अदा करेल.

परिस्थिती-२ : जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई १६० रुपये असल्यास बर्न कॉस्ट नुसार ११० टक्के प्रमाणे विमा कंपनी संपुर्ण १६० रूपये नुकसान भरपाई अदा करेल.

परिस्थिती-३ : जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई ९५ रुपये असल्यास विमा कंपनी संपुर्ण ९५ रुपये नुकसान भरपाई अदा करेल व विमा कंपनी स्वतः कडे ५ रुपये नफा ठेवेल.

परिस्थिती-४ : जर जिल्हा समूहामध्ये देय नुकसान भरपाई ५० रुपये असल्यास विमा कंपनी संपुर्ण ५० रुपये नुकसान भरपाई अदा करेल, विमा कंपनी स्वतः कडे २० रुपये नफा ठेऊन उर्वरीत ३० रुपये राज्य शासनास परत करेल.

टॅग्स :पीक विमाशेती क्षेत्रशेती