Join us
Daily Top 2Weekly Top 5

दगड-धोंडयांनी भरलेल्या जमिनीला दिली संजीवनी, आता चंदनापासून फुलशेतीपर्यंत माळरान खुललं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:30 IST

Agriculture News : दगड-धोंडयांनी भरलेल्या या जमिनीकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. मात्र....

- जयंत जेनेकर चंद्रपूर : तालुक्यातील दुर्गाडी गावालगत असलेली सुमारे पाच एकरांची जमीन कधीकाळी शेतीयोग्य नसलेले रखरखीत माळरान म्हणून ओळखली जात होती. दगड-धोंडयांनी भरलेल्या या जमिनीकडे अनेकांनी पाठ फिरवली होती. मात्र, खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक शत्रुघ्न सीताराम तुमराम यांनी या जमिनीत शक्यता पाहिल्या आणि अथक परिश्रमातून तिला सुपीक शेतजमिनीत रूपांतरित केले.

ही शेती मूळ मालक सीताराम गोदरुजी तुमराम यांची असून, त्यांचे पुत्र शत्रुघ्न तुमराम सध्या ती कसत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी मोठ्या प्रमाणावर श्रम करून दगड-धोंडे बाजूला काढले, जमिनीची सखोल मशागत केली आणि मातीची सुपीकता वाढवण्यावर भर दिला. सातत्यपूर्ण मेहनत आणि योग्य नियोजनामुळे या जमिनीत नवचैतन्य निर्माण झाले.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरणारे आणि त्याच वेळी शेतीतही नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे हे शिक्षक तालुक्यात सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहेत. दुर्गाडी गावालगत माळरानावर फुललेले हे नंदनवन आज अनेकांसाठी आशा, प्रेरणा आणि आत्मविश्वासाचे प्रतीक बनले आहे.

पारंपरिकतेला आधुनिकतेची जोडआज या शेतीत लाल चंदन, आंबा, फणस, झेंडू तसेच विविध शोभिवंत फुलझाडांची नियोजनबद्ध लागवड करण्यात आली आहे. यासोबतच गहू, फुलकोबी, भेंडी, कारले ही पारंपरिक पिकेही घेतली जात आहे. शेतीला आधुनिक व प्रयोगशील पद्धतींची जोड देत त्यांनी उत्पादनक्षमतेसोबतच शेतीला एक वेगळे सौंदर्य प्राप्त करून दिले आहे.

झाडांचे केले संवर्धनया शेतीचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे शेतात आधीपासून असलेली मोठी झाडे न तोडता त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. त्या झाडांच्या भोवती विश्रांतीसाठी विसावा ओटे उभारून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. हिरवळ, फुलांची रंगत आणि नैसर्गिक सावलीमुळे ही शेती केवळ उत्पादनापुरती मर्यादित न राहता पर्यटनाच्या दृष्टीनेही आकर्षक ठरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Barren Land Transformed: Teacher Cultivates Success with Sandalwood and Flowers

Web Summary : Teacher Shatrughna Tumram transformed barren land into a thriving farm. He cultivates sandalwood, mangoes, flowers, and vegetables. Retaining existing trees, he added resting spots, creating an eco-friendly, productive, and visually appealing landscape, inspiring others.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीचंद्रपूरफुलशेती