Join us

मालेगाव कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण, शेतकऱ्यांचा सहभाग 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 1:34 PM

कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे पार पडला.

कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा (ATMA ) नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत निवड केलेल्या गटप्रमुख अधिनिस्त कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे पार पडला.    मालेगाव कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास सटाणा तालुक्यातील गावांमधील नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या गटप्रमुखांचे व त्या संबंधित कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांचे हे प्रशिक्षण घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ अमित पाटील, मृदा शास्त्रज्ञ विजय शिंदे, पिक संरक्षण शास्त्रज्ञ विशाल चौधरी, उद्यानविद्या शास्त्रज्ञ पवन चौधरी आणि उपविभागीय कृषी अधिकारी मालेगाव गोकुळ अहिरे,आत्माचे तालुकास्तरीय अधिकारी,  कृषी सहाय्यक आणि विविध गटातील गटप्रमुख सचिव आणि खजिनदार या कार्यक्रमास उपस्थित होते.         पहिल्या दिवसाच्या प्रथम सत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ अमित पाटील यांनी प्रास्ताविक करताना डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन मध्ये राबविल्या जाणाऱ्या गोष्टींचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या योजनेमधून शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने आपला शेतीमाल कसा पिकवायचा या गोष्टीवर भर देताना यासाठी शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेणे फार महत्त्वाचे आहे, असे नमूद केले.

या कार्यक्रमाच्या वेळी पीक संरक्षण शास्त्रज्ञ श्री विशाल चौधरी यांनी पीक संरक्षण विषयी बोलताना नैसर्गिक व सेंद्रिय शेती म्हणजे काय व सोबत शेतीमध्ये कीड व रोग संरक्षणासाठी आणि जिवाणूंची संख्या वाढविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना जीवामृत, बिजामृत ,घन जीवामृत दशपर्णी अर्क ,निमाश्र, ब्रह्मास्त्र, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि ह्युमिक द्रावण, ई.एम. 2  सोल्युशन कशाप्रकारे तयार करायचं? त्याचा वापर कसा करायचा?  याविषयी पूर्ण मार्गदर्शन केले. 

यानंतर कृषी विज्ञान केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ विजय शिंदे यांनी माती व पाणी परिक्षणाचे महत्व व जमिनीच्या आरोग्यापासून जमीन संवर्धनासाठी जमिनीमध्ये बायोडायनामिक कंपोस्ट खत, स्फुरद युक्त कंपोस्ट खत म्हणजेच प्रोम आणि गांडूळ खत कशाप्रकारे निर्मिती करता येईल आणि आपल्याला एक छोटेखाणी व्यवसाय कशा पद्धतीने शाश्वत करता येईल, याविषयी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये उद्यान विद्या शास्त्रज्ञ पवन चौधरी यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. 

दुसऱ्या सत्रात अनेक विषयांवर चर्चा  दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या केंद्राने उभारलेल्या निविष्ठा निर्मिती युनिटमध्ये शास्त्रज्ञ विशाल चौधरी यांनी शेतकऱ्यांना जीवामृत कशाप्रकारे बनवायचे? तसेच जीवामृत करताना कोणकोणत्या बाबींचा वापर करायचा? दशपर्णी अर्क बनवताना कोणत्या वनस्पतींचा वापर करायचा? याविषयी प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले. यासोबत विजय शिंदे यांनी गांडूळ खत बेड कसा भरावा, वेस्ट डी कंपोझर बनविण्याचे विषयीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. दुपारच्या सत्रामध्ये नैसर्गिक शेती पद्धतीने लावलेल्या गहू आणि हरभरा पिकामध्ये भेट देण्यात आली. यानंतर  शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले आणि सर्व प्रशिक्षणार्थी लाभार्थींना प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. 

टॅग्स :शेतीमालेगांवनाशिकशेती क्षेत्र