Natural Farming : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कृषी विज्ञान केंद्रात (Malegoan KVK) राष्ट्रीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण (Natural farming) संपन्न झाले. नैसर्गिक शेती प्रशिक्षण म्हणजे शेतकऱ्यांना आणि इतर संबंधितांना नैसर्गिक शेती पद्धती आणि तंत्रांचे ज्ञान देणे. या प्रशिक्षणातून नैसर्गिक शेतीचे फायदे, विविध पद्धती, आणि आवश्यक बाबी शिकवल्या जातात.
गेल्या काही वर्षात शेतीत रासायनिक खतांचा (Fertilizer) वापर वाढला आहे. परिणामी केंद्र सरकारच्या माध्यमातून नैसर्गिक शेती मिशन राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मालेगाव कृषी विज्ञान केंद्र येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण घेण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) मालेगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान(NMNF) अंतर्गत कृषी सखी/सीआरपसाठी पाच दिवसीय नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी विषय विशेषज्ञ, पिक संरक्षण विशाल चौधरी म्हणाले की, नैसर्गिक शेतीमध्ये आपण जीवामृत, बीजामृत आच्छादन, वाफसा यासोबत वनस्पतिजन्य अर्क , जैविक कीडनाशके या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून रासायनिक निविष्ठांवर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च या नैसर्गिक शेतीमार्फत कमी करू शकतो. सोबत जमिनीचे आरोग्य, विषमुक्त अन्न या शेतीच्या माध्यमातून समाजाला उपलब्ध करून देऊ शकतो.
प्रशिक्षणात काय काय शिकवलं? या पाच दिवसीय प्रशिक्षणात नैसर्गिक /सेंद्रिय शेतीची ओळख व सोबत नैसर्गिक शेतीमध्ये कीड व रोग व्यवस्थापन, जमीन आरोग्य व्यवस्थापन, घरच्या घरी जैविक कीडनाशक बनविणे, एकात्मिक शेती पद्धती, पिक उत्पादन तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती अभियानाची ओळख, नैसर्गिक शेतीत पशुपालनाचे एकत्रीकरण या सोबत कृषि विज्ञान केंद्र येथे निविष्ठा निर्मिती केंद्रामध्ये जीवामृत, घनजीवामृत बीजामृत, दशपर्णी अर्क, दहा ड्रम थिअरी, निंबोळी अर्क तयार करण्याविषयीचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे अमित पाटील, प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ, विजय शिंदे, विषय विशेषज्ञ, मृदाशास्त्र, रूपेश खेडकर, विषय विशेषज्ञ, कृषीविद्या, पवन चौधरी विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, संदीप नेरकर विषय विशेषज्ञ दुग्ध व पशुविज्ञान तसेच विलास सोनवणे उपसंचालक आत्मा नाशिक हे उपस्थित होते. तसेच देवळा, कळवण, नांदगाव मालेगाव व सटाणा तालुक्यातील विविध गावामधील निवड झालेल्या सीआरपी/ कृषी सखी महिला उपस्थित होत्या.