Join us

शेतकऱ्यांनो! पीएम किसानची ई केवायसी करा! अनेक शेतकरी वंचित 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 12:49 PM

शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई- केवायसी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई केवायसी झालेली नाही. त्यामुळे ते शेतकरी आगामी 16व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई- केवायसी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. ही ई केवायसी कशी पूर्ण करावी, हे समजून घेऊया. 

साधारण अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 1.90 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी तब्बल 14 हजार 421 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्यापही अपूर्ण असल्याने ते शेतकरी आगामी 16 व्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई- केवायसी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, आता कृषी विभागाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सर्व पात्र व्यक्तींना करून देण्यासाठी गावपातळीवर संपृक्तता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती असून, या मोहिमेंतर्गत गावपातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यात काय स्थिती? 

अकोला जिल्ह्यात 6 डिसेंबर 2023 पर्यंत 1 लाख 90 हजार 648 शेतकरी कुटुंबांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केलेली असून त्यापैकी जमिनीचा तपशील अद्ययावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे व ई- केवायसी प्रमाणीकरण करणे याकरिता एकूण 14 हजार 421 लाभार्थी प्रलंबित आहेत. पीएम किसान योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने पीएम किसान पोर्टल व मोबाइल अॅपची सुविधा विकसित केली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा प्रस्तावित 16 वा हप्ता वितरित करण्यापूर्वी ही संपृक्त्तता मोहीम गावपातळीवर राबवत आहे. शेतकयांनी तत्काळ जमिनीचा तपशील अद्ययावत करणे, बैंक खाते आधार संलग्न करणे व ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे.

ई-केवायसी कशी करावी ?

तर पहिल्यांदा पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा. त्यात तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा. सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच पात्र व्यक्तींनी गावातील संबंधित व्हिलेज नोडल ऑफिसर, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून विशेष मोहिमेत सहभागी व्हावे व प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

टॅग्स :अकोलाशेतीप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना