Join us

ऊसतोड कामगारांच्या वारसांना मदत, किती निधी, कुणाला मिळणार अर्थसाहाय्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 19:33 IST

आवश्यक कागदपत्रांची पडताळणी छाननी करून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना निधींचे वाटप केले जाणार आहे. 

नाशिक : राज्यातील १० लाख ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाबाबत शासनाने दिलासादायक निर्णय घेतला आहे .ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीय वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार पाच जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या वारसांना पाच लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे. 

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांच्याकरिता अपघात विमा देखील प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र सदर विमा योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी अवधी लागत असल्याने सद्यस्थितीत अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबे वारसांना तातडीने रुपये ५ लाखाची मदत देण्याचे शासनाचे निर्णय घेतला आहे. 

यासंदर्भात महामंडळाकडे राज्यातून प्राप्त झालेल्या ६७ प्रकरणांमध्ये प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे एकूण ३ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. सदर निधीतून लाभार्थ्यांना त्या-त्या जिल्ह्याचे मंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते त्याबाबतचा धनादेश लवकरच वारसांना वाटप करण्यात येणार आहे. याबाबत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार व मुकादम यांचा अपघाती मृत्यू झाला आहे अशा व्यक्तींच्या अपघाती मृत्यू बाबत संबंधित जिल्हाधिकारी, प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी छाननी करून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना निधींचे वाटप केले जाणार आहे. 

न्याय विभागाच्या पाठपुराव्याला यश 

सदर अपघाताच्या स्वरूपांमध्ये रस्ते, रेल्वे अपघात ,पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू ,उंचीवरून पडून झालेला अपघात, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्यकारणाने झालेला विषबाधा, सर्पदंश, विंचूदंश, जनावराने चावा घेणे, रेबीज, कोणत्याही प्राण्याने जखमी केल्यामुळे अपंगत्व येणे, किंवा मृत्यू येणे, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, दंगलीतील अपंगत्व अथवा मृत्यू, खून, आगीमुळे झालेला अपघात व अन्य कोणताही अपघात याचा समावेश करण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिनेश डोके व व्यवस्थापक बाळासाहेब सोळंकी यांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर या मागणीला यश आले आहे.

जिल्हास्तरावर प्रस्ताव तपासणी 

लोकनेते गोपीनाथ मुंडे महामडंळाने ऊसतोड कामगाराच्या मृत्यूनंतर मदतीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावावर सारासार विचार करून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुदान देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार शासनाने या प्रस्तावावर निर्णय घेत निधी मंजूर केला आहे. त्यानुसार निधी संबंधित जिल्ह्याना वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्रति लाभार्थी पाच लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. दरम्यान निधी वाटपासाठी जिल्हास्तरावर खातरजमा करण्यात येईल त्यानंतर निधीचे वाटप केले जाणार आहे. यासाठी बीड जिल्ह्यातून सर्वाधिक ३१ आणि अहमदनगर जिल्ह्यातून २३ प्रस्ताव दाखल झाले आहेत. तर उर्वरित जालना, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रस्ताव आले असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश डोके यांनी दिली आहे. 

मदत फार मोलाची ठरणार

उसतोड कामगार संघटनेचे सुरेश पवार म्हणाले की, तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महाराष्ट्र मयत ऊसतोड कामगारांच्या वारसाना आर्थिक मदत मिळावी यासाठी  सामाजिक न्याय विभागाकडे संघटनेची मागणी होती. केलेल्या मागणीला मा.प्रधान सचिव आदरणीय भांगे साहेब तसे सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त तथा संस्थापकीय संचालक आदरणीय बकोरिया साहेब यांच्या स्तरावर  5 लाखाची आर्थिक मदत जाहीर केली. जिल्हा निहाय मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना येत्या काही दिवसात पाच लाखाचे धनादेश वितरित होणार चर्चा झाली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मयत ऊसतोड कामगारांच्या वारसाना देण्यात येणारी 5 लाखाची आर्थिक मदत फार मोलाची ठरणार आहे.      

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीसाखर कारखानेऊस