Join us

जुनी धान्य मोजण्याची सगळी मापे माहिती आहेत का तुम्हाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:32 IST

Agriculture News : शेतामध्ये धान्याच्या मोठ्या प्रमाणावर राशी (ढीग) असायच्या व ते पोत्यामध्ये भरण्यापूर्वी त्याचे मोजमाप केले जात होते.

- मंगल जीवने चंद्रपूर : ग्रामीण भागातील अनेक साधने, वस्तू या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात काळाच्या पडद्याआड गेल्याने त्या वस्तू आता प्रत्येकाच्या घरात शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यात धान्य मोजण्याची मापे दुकानात तराजूत ठेवणारे एक किलो, अर्धा किलोचे वजन गायब होत चालले असून, त्या ठिकाणी आधुनिक डिजिटल वजन काटे आले असल्याने जुन्या वस्तू कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी स्वरूपाची धान्ये पिकवीत होते. त्यामुळे शेतामध्ये धान्याच्या मोठ्या प्रमाणावर राशी (ढीग) असायच्या व ते पोत्यामध्ये भरण्यापूर्वी त्याचे मोजमाप केले जात होते. त्यासाठी भांड्याच्या वेगवेगळ्या आकाराची मापे असायची. त्याने धान्य भरून मोजून पोत्यामध्ये भरले जात असायचे. ती मापे पितळी, लोखंडी अथवा पत्र्यापासून बनवलेली असायची. 

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागातील मंडळी शिक्षणापासून दुरावलेली असल्यामुळे ते आपल्या शेतात पिकवलेले धान्य हे शेर, पायली (धान्य मोजण्याचे लोखंडी पत्र्याचे साधन) पासरी, तागडीने विकायची तर शहरातील दुकानदार वजन ठेवून तराजुने धान्य व एक पाव तेल देण्याची मापे ठेवायचे. कापडाच्या दुकानात गज (तीन फुटांची धातूची, इंचाच्या व फुटाच्या खुणा असलेली जाड पट्टी) ती सापडली नाही तर दुकानदार 'हातभरा'चे माप काढून कापड मोजून द्यायचा. 

हातापासून खांद्यापर्यंत कापड ताणून घडी घालत एक, दोन, अगदी अडीच वार सुद्धा मोजून द्यायचा. आठवडी बाजारात बरीच वर्षे ही मापाची 'हस्तकला' मान्यता प्राप्त होती. सरपणाची लाकडे, कोळसा मोठ्या तराजूत तोलून देताना धडा, मन ही वजने असत. सोनाराच्या दुकानात सोने तोलताना गुंज हे सर्वात लहान माप. गुंज दिसायला सुंदर असे.

व्यावसायिक धान्याची जुनी मापे अशी प्रचलित होती...४ शेर म्हणजे १ पायली१६ पायल्या म्हणजे १ मन, २० मन म्हणजे १ खंडीदुधा, तेलाची मापे : १ पावशेर, १ शेर म्हणजे अंदाजे २ किलोकोळव म्हणजे पाव किलो (२५० ग्रॅम)निळव म्हणजे आत पाव (१२५ ग्रॅम)चिडव म्हणजे छटाक (५० ग्रॅम)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीकृषी योजना