खुरासणी म्हणजे कारळे. हे खुरासणी (कारळे), खडे मीठ, लाल सुकलेल्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या गरम लोखंडी तव्यावर मस्तं खरपूस भाजल्यावर लोखंडी खलबत्त्यात कुटून त्याची बारीक पूड केली जाते. गरम मऊ नाचणीच्या भाकरी सोबत ही खुरासण्याची चटणी अत्यंत चविष्ट लागते.
अनेकदा प्रवासासाठी बाहेर पडले आणि मुंबईची हद्द पार केली की दिसायला लागतात ती मिठाघरे, भाताची शेती, उंच सह्याद्रीच्या रांगा. त्यातून वाट कढणाऱ्या, डोक्यावर वाळकी लाकडे घेऊन जाणाऱ्या आणि गुडघ्यापर्यंत घट्ट लुगडं नेसलेल्या कातकरी बायका. हाच कातकरी समाज आणि त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घेण्यासाठी मुरबाड तालुक्यातल्या शिसेवाडी गावात पोहोचलो.
सगळं गाव अगदी पहाटेच उठून कामाला लागतं. वेतापासून टोपल्या तयार करणं, जंगलात जाऊन चुलीसाठी लाकडं गोळा करणं, पळसाची फुलं, पानं तोडणं, खाण्याचा डिंक जंगलातून शोधून वाळवणं, पळसाच्या फुलांपासून रंग तयार करून टोपल्यांना रंगवणं, करवंद गोळा करून पानांच्या द्रोणात घालून पर्यटकांना विकणं हा कातकरी लोकांचा दिनक्रम.
कातकरी समाजाची घरं अगदी पारंपरिक मातीची आणि शेणाने सारवलेली दुपाखी, जमिनीला टेकलेली. या मातीच्या प्रत्येक घरात चुली पेटवलेल्या दिसत होत्या. याच चुलीवरचा फक्कड कावा चहा आम्हाला मिळाला. पाण्यात आलं, गवती चहाची पाती तथा लेमन ग्रास, लवंग, वेलदोडे, मिरे, अगदी थोडी चहाची पूड आणि चवीसाठी गूळ टाकून उकळवलेला चहा. हा चहा पिला की आलेला थकवा, झोप पार पळवून लावतो.
पळसाची पानं, गोंद, फुलं, गवत, करवंद असा रानमेवा गोळा करण्यासाठी कातकरी स्त्रिया आणि पुरुष डोंगरदऱ्या फिरत असतात आणि या सगळ्या कामासाठी लागणारी ताक येते, ती त्यांच्या रोजच्या आहारातून. चुलीवरची गरमागरम मऊ नाचणीची भाकरी आणि खुरासणीची कोंडी. खुरासणी म्हणजे कारळे. हे खुरासणी (कारळे), खडे मीठ, लाल सुकलेल्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या गरम लोखंडी तव्यावर मस्तं खरपूस भाजल्यावर लोखंडी खलबत्त्यात कुटून त्याची बारीक पूड केली जाते. गरम मऊ नाचणीच्या भाकरी सोबत ही खुरासण्याची चटणी अत्यंत चविष्ट लागते.
नाचणीची भाकरी मऊ होण्यासाठी तव्यावरच पाणी उकळत ठेवलं जातं आणि लाकडी परातीत काढलेल्या नाचणी पीठात घालून मळून घेतलं जातं. हातावर थापलेली भाकरी भाजून घेतली जातो. नाचणी आणि काळ्या तिळात मोठ्या प्रमाणात लोह असल्यामुळे साध्या; पण चविष्ट पदार्थांचा समावेश आपल्या आहारात कधीतरी करायला काही हरकत नाही.
- शेफाली साधू मुंबई, खाद्यसंस्कृती अभ्यासक