नाशिक : जिल्ह्यात सर्वत्र खरिपाची (Kharif Season) तयारी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, डीएपी खताची उपलब्धता कमी झाल्याने अनेक भागात कृषी दुकानदारांकडून ते अव्वाच्या सव्वा दरात विक्री होत आहे. डीएपी खत महत्त्वाचे असल्याने शेतकरी याच खताकडे वळतात.
मात्र, त्याला पर्याय अनेक देशी चांगली खते असताना या खतांकडे पाठ फिरविली जात असल्याने ही खते मात्र भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. जास्त दरात खते विकणाऱ्या दुकानदारांकडे कृषी विभागाच्या (Agriculture Department) भरारी पथकाने मोर्चा वळवावा, अशी मागणी होत आहे.
शेतकरी डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताला जास्त पसंती देतात. कारण ते पिकांना नायट्रोजन आणि फॉस्फरसचा चांगला पुरवठा करतात. जे सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. मात्र, ही मात्रा जवळपास सर्वच खतांमध्ये कमी-अधिक प्रमाणात असते.
डीएपी खताच्या कमतरतेचे सावट का?कृषितज्ज्ञांशी चर्चा केली असता डीएपी (डाय - अमोनियम फॉस्फेट) खताच्या कमतरतेचे सावट मुख्यत्वे पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे आणि वाढत्या मागणीमुळे असल्याचे समोर आले. जागतिक स्तरावर कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आणि वाहतूक समस्यांमुळे खत कंपन्यांना डीएपीचा पुरवठा वेळेवर करणे कठीण झाले आहे.
डीएपी खताला पर्याय कायडीएपी खताची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरदयुक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत देशांतर्गत तयार होत असून, यामध्ये स्फुरद १६ टक्क्यांसह ११ टक्के गंधक व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोण व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डीएपीस चांगला पर्याय आहे. याशिवाय डीएपीला इतर अजून काही पर्याय आहेत.
खताचे वितरण कसे होते?डीएपी खताचे वितरण साधारणपणे सरकारी अनुदानित आणि खासगी वितरण प्रणालीद्वारे केले जाते. वेगवेगळ्या खत कंपन्यांना पुरवठा करण्याचे काम सोपवले जाते. यानंतर वितरकांचे जाळे आणि जिल्ह्यांमधील खपाचा इतिहास तपासून खत पुरवठा केला जातो.
काळ्या बाजारामुळे खत मर्यादितडीएपी खताची मागणी आणि पुरवठ्यात तफावत आहे. डीएपी खताचा मोठा भाग भारतात आयात केला जातो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्या किमती वाढत आहेत, ज्यामुळे त्याची उपलब्धता मर्यादित होते. याशिवाय, काही भागात डीएपी खताचा काळाबाजार करत ते जास्त किमतीत विकले जाते. त्यामुळे हे खत मर्यादित आहे.