नाशिक :बुद्ध पौर्णिमेच्या (Budhha Paurnima) चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाच्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात (Kalsubai Harishchandragad Sanctuary) पाणवठा वन्यप्राणी गणनेची जय्यत तयारी केली जात आहे. भंडारदरा-राजुर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या या अभयारण्यात एकूण २२ मचाणी, ३० निरीक्षण मनोरे आणि ३७ ट्रॅप कॅमेऱ्यांसह वन्यजीव अधिकारी, कर्मचारी गणनेसाठी वापर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिक-अहिल्यानगरच्या (Nashik) सीमेवर असलेल्या कळसूबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यामध्ये वन्यप्राणी गणनेच्या तयारीला वेग आला आहे. भंडारदरा, राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या अभयारण्यातील वनक्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी मचाणी बांधणी केली जात आहे. दोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये एकूण पंधरांपेक्षा जास्त लोखंडी निरीक्षण मनोरे बांधण्यात आलेले आहेत. या मनोऱ्यांचाही वापर चांदण्या रात्री वन्यप्राणी निरीक्षणासाठी करण्यात येणार आहे.
वन्यप्राण्यांचे निरीक्षणदोन्ही वनपरिक्षेत्रांमध्ये वन्यप्राणी गणना येत्या सोमवारी सायंकाळी ६ वाजेपासून मंगळवारी पहाटे ६ वाजेपर्यंत केली जाणार आहे. पाणवठवांसह अन्य काही नैसर्गिक तलाव, झऱ्यांवर रात्रीच्या चंद्रप्रकाशात तहान भागविण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांचे निरीक्षण यादरम्यान करत गणना करण्यात येणार आहे. दरवर्षी ही गणना अभयारण्यामध्ये केली जाते.
अवकाळी पावसाचे सावटअहिल्यानगर जिल्ह्याला हवामान खात्याकडून बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मागील दोन दिवस अवकाळी पावसाने अभयारण्य क्षेत्रात दमदार हजेरी लावली होती. यामुळे वन्यप्राणी गणनेवर अवकाळी पावसाचे सावट असणार आहे. यामुळे वन्यजीव विभागाच्या कर्मचान्यांना तशी खबरदारी घेण्याच्या सूचनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
या वन्यप्राण्यांचा वावरबिबट्या, शेकरू, वानर, माकड, मोर, कोल्हा, खोकड, साळींदर, तरस, रानडुक्कर, भेकर, सांबर, रानमांजर, उदमांजर, घोरपड या वन्यप्राण्यांसह विविधप्रकारचे सरपटणारे सरीसृप, पक्ष्यांचा वावर या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात आढळून येतो.
प्रभावी वन गस्तीचा 'अलर्ट'चांदण्या रात्री वनविभाग प्रादेशिक, वन्यजीव विभाग, वनविकास महामंडळाला जंगलात प्रभावी रात्र गस्तीचे आदेश देत 'अलर्ट' जारी केला आहे. शिकारीच्या उद्देशाने जंगलात घुसखोरीची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पूर्व, पश्चिम वनविभागासह वनविकास महामंडळाच्या सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.