Join us
Daily Top 2Weekly Top 5

Agriculture News : औद्योगिक वापरासाठीचा युरिया गोदामात कसा आला? कृषी विभागाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:38 IST

Agriculture News : तीन गोदामांमध्ये 'टेक्निकल ग्रेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल यूज ओन्ली' असे लिहिलेल्या युरियाचा साठा आढळून आला.

Agriculture News : गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाची (Urea) साठेबाजी केली असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाने रविवारी रात्री आर्वी आणि कारंजा तालुक्यात चौकशी केली. यादरम्यान त्यांना तीन गोदामांमध्ये 'टेक्निकल ग्रेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल यूज ओन्ली' असे लिहिलेल्या युरियाचा साठा आढळून आला. तिन्ही गोदामातून ४ हजार ६३५ बॅग युरिया आढळून आल्याने गोदाम सील केले आहे. याप्रकरणी कृषी व्यावसायिकांत मोठी खळबळ उडाली आहे. 

शेतीचा हंगाम सुरू असून, यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. त्या अनुषंगाने कृषी विभागही अॅक्शन मोडवर आला आहे. अशातच त्यांना आर्वी व कारंजा (घाडगे) तालुक्यातील काही ठिकाणी गोदामामध्ये युरियाची साठेबाजी केल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारंजा तालुक्यातील राजणी येथील कोहली यांच्या गोदामाची तपासणी केली असता त्यात १ हजार १६० बेंग युरिया आढळून आला. त्यावर 'टेक्निकल ग्रेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल यूज ओन्ली' असे लिहिलेले होते. त्यामुळे येथील युरियाचे नमुने घेऊन गोदाम सील केले. 

तसेच आर्वी तालुक्यातील बाजारवाडा येथील विजय वाजपेयी यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. या गोदामात अशाच प्रकारचा तब्बल २ हजार ३४२ बॅग युरिया आढळून आला. येथीलही नमुने घेऊन गोदाम सील केले. यासोबतच याच तालुक्यातील पिंपळखुटा येथील अग्रवाल यांच्याही गोदामात १ हजार ११३ बॅग युरिया आढळून आला. त्यामुळे तिन्ही गोदाम सील करून युरियाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. कृषी विभागाने तिन्ही गोदामातून १२ लाख ३५ हजार २०० रुपयांच्या ४ हजार ६३५ बॅग युरिया जप्त करून तो स्थानिक पोलिसांत ठाण्याकडे सुपुर्द नाम्यावर ठेवला आहे. 

औद्योगिक वापराचा युरिया शेतीसाठीशेतीचे दिवस असल्याने सध्या शेतीकरिता युरियाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशातच आर्वी व कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फक्त औद्योगिक वापरासाठीच असलेला युरिया आढळून आला. त्यामुळे हा युरिया इतकाच होता की यापेक्षाही जास्त साठा होता, हा युरिया शेतीकरिता वापरला का? कुण्या शेतकऱ्यांना विकला का? हा साठा कशासाठी करण्यात आला, याचा उलगडा आता तपासणी अहवालानंतरच होईल.

गोपनीय माहितीच्या आधारे कारंजा तालुक्यातील राजणी आणि आर्वी तालुक्यातील बाजारवाडा व पिंपळखुटा या तीन गुदामातून ४ हजार ६३५ बॅग युरिया जप्त करण्यात आला. या बॅगवर 'टेक्निकल ग्रेड युरिया, फॉर इंडस्ट्रीयल युज ओन्ली असे लिहिलेले आहेत. याचे नमुने घेऊन अमरावतीच्या प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल.

- संजय बमनोटे, कृषी विकास अधिकारी, जि.प., वर्धा.

टॅग्स :खतेशेती क्षेत्रशेतीवर्धा