Join us

Agriculture News : खत विक्रेत्यांना सूचना, आधार लिंक असेल तरच विक्री... कृषी विभागाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:58 IST

Agriculture News : राज्यात खतांची कृत्रिम टंचाई (Fertilizer Shortage) निर्माण केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खत विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. 

जळगाव : राज्यात काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई (Fertilizer Shortage) निर्माण केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कृषी विभागाने खत विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. 

आतापर्यंत जामनेर आणि धरणगाव तालुक्यांमधील १०० टक्के खत विक्रेत्यांची तपासणी पूर्ण झाली असून, तसेच आधार लिंक शिवाय खतांची विक्री झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी  प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

कृषी विभागाच्या तपासणीत अनेक ठिकाणी पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर न करता खताची विक्री झाल्याचे निदर्शनास आलं आहे. यामुळे काही ठिकाणी पीओएस मशीनवरील साठा आणि दुकानातील प्रत्यक्ष साठा यात मोठी तफावत आढळून आली आहे. यासंदर्भात संबंधित खत विक्रेत्यांना कृषी विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचीही माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र तपासणी सुरूसध्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खत विक्रेत्यांच्या साठ्याची कसून तपासणी सुरू आहे. यामध्ये खताचा साठा, झालेली विक्री, इन्व्हॉइस रेकॉर्ड आणि पीओएस प्रणालीचा वापर यांची बारकाईने तपासणी केली जात आहे. कुठेही अनियमितता किंवा तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

खत विक्रेत्यांना सूचना, आधार लिंक असेल तरच विक्री...कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ पासून अनुदानित खत विक्रीसाठी पीओएस मशीनद्वारे आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघन होत असल्याने खत पुरवठा व्यवस्थेत अडचणी येत आहेत. 

यामुळेच, 'आधार नसेल तर विक्री नाही' या धोरणाचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व खत विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनीही खत खरेदी करताना आपलं आधारकार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे, कारण आधार लिंक केल्याशिवाय त्यांना खत खरेदी करता येणार नाही.

Soyabean Market : ऑगस्ट 2025 मध्ये सोयाबीनचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :खतेआधार कार्डशेती क्षेत्रशेती