Agriculture News : खरं तर आदिवासी भागात उन्हाळ्यात प्रचंड पाणी टंचाईला (Water Scarcity) सामोरे जावे लागते. परिणामी शेती नाही, रोजगाराचे साधन नाही. म्हणूनच मार्च एप्रिल महिन्यात आदिवासी बांधवांचे रोजगारासाठी स्थलांतर होण्यास सुरवात होते. महत्वाचे म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासूनचे हे स्थलांतर आजही सुरूच आहे.
नाशिक जिल्ह्याचा (Nashik District) विचार करता पेठ, सुरगाणा, कळवण, त्रंबकेश्वर-इगतपुरी या भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. भात पिकाची (Dhan Lagvad) मोठी लागवड या परिसरात होते. आणि भात पीक काढणीनंतर साधारण डिसेंबर जानेवारीच्या महिन्यापर्यंत आणि जास्तीत जास्त फेब्रुवारीपर्यंत शेतीची कामे सुरू असतात. मात्र त्यानंतर मार्च, एप्रिल, मे या उन्हाळ्याच्या महिन्यात आदिवासी बांधवांना बसून काढावे लागतात. म्हणूनच या दिवसात रोजगारासाठी त्यांना बाहेर पडावे लागते.
दरम्यान याच सुमारास नाशिकच्या सिन्नर येवला, निफाड या परिसरात कांदा काढणीसह (kanda Kadhani) इतर शेतीची कामे सुरू असतात. तसेच नाशिक शहरात देखील अनेक काम सुरू असतात आणि या दिवसात रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून आदिवासी बांधव थेट महिन्याचा संसार एकत्र करून नाशिक शहर किंवा कांदा काढणीचा ठिकाणे गाठतात. अनेक जण नाशिक शहरालाच प्राधान्य देऊन या ठिकाणी बांधकाम मजूर म्हणून 500 ते 600 रुपये रोजाने काम करतात. अशा वेळी जवळपास महिना ते दीड महिना होऊ नये, हे बांधव घरी परतत नाहीत, मग शेवटी खरिपाच्या पूर्व तयारीच्या कामांसाठी ते माघारी परततात.
रोजगारासाठी स्थलांतर म्हणजे काय तर एका गावाहून दुसऱ्या शहराच्या ठिकाणी किंवा सधन गावाच्या ठिकाणी मजुरीसाठी जाणे. या ग्रामीण भागातील आदिवासी बांधव चार ते पाच कुटुंबाच्या समूहाने रोजगारासाठी स्थलांतर करतात. मग अशावेळी लहान मुलं ही वयोवृद्ध माणसांकडे सोपवली जातात. या काळात भीषण पाणीटंचाईची समस्या देखील असल्याने अनेक जण शहरांची वाट धरत असतात.
गिरणारे बनलय रोजगाराचे केंद्र नाशिक जवळील टोमॅटो मार्केट म्हणून ओळख असलेल्या गिरणारे या परिसरात गेल्या काही वर्षात आदिवासी बांधवांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या परिसरात भाजीपाला उत्पादकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी शेती करतात. त्यामुळे वर्षभर शेतीची कामे या परिसरात सुरू असतात म्हणूनच गेल्या काही वर्षात गिरणारे हे रोजगाराचे प्रमुख केंद्र बनले आहे. या ठिकाणी जवळपास ५० ते ६० किलोमीटर परिसरातून देखील आदिवासी बांधव रोजगारासाठी पहाटेच दाखल होतात. त्यामुळे यंदा हरसूल आणि पेठ तालुक्यातील गिरणारे नजीकच्या भागातून स्थलांतराचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.