Join us

Agriculture News : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अवलंबली तूर पेरणीची नवी पद्धत, जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:27 IST

Agriculture News : या पद्धतीमुळे तूर पिकावर मर रोग किंवा आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात दिसणार आहे. 

अमरावती : मागील काही वर्षांपासून तुरीच्या पिकामध्ये (Tur Crop) सातत्याने घट होत आहे. शेतकरी बांधवांनी यावर्षी मात्र कृषी विभागाच्या आवाहनाला साथ देत जास्तीत जास्त क्षेत्रावर तूर पिकाची बेडवर पेरणी/टोबणी केली. गावागावात बेडमेकरची संख्या यामुळे वाढलेली आहे. यामुळे दिसणारा चांगला परिणाम म्हणजे, तूर पिकावर मर रोग किंवा आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात दिसणार आहे. 

चांदूर रेल्वे (Chandur Railway) तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात शेतकरी व शेतीच्या हिताची बेडवरील तूर पिकाची पेरणी तालुक्यातील एकूण तूर क्षेत्रापैकी ७० टक्के म्हणजेच ३ हजार ५४७ हेक्टरवर झाली आहे. चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाला पहिली पसंती दर्शवली असून त्याची १९ हजार ३५८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यानंतर कपाशीचे ६ हजार ७०६ हेक्टर व तुरीची ५ हजार ९१५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. 

तुरीच्या बेडपासून सोयाबीनच्या ओळीमध्ये थोडे अंतर सुटत असल्यामुळे सोयाबीन व तूर पिकाला हवा मिळायला वाव राहणार आहे, त्यामुळे आपोआपच सोयाबीन पिकाचेसुद्धा उत्पादन वाढणार आहे. तूर पीक बेडवर असल्यामुळे ते सोयाबीन पिकापेक्षा उंच राहन त्याची वाढ खुंटणार नाही. तर याबाबत चांदूर रेल्वेचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बांबल म्हणाले की, बेडवर तूर पीक पेरल्यामुळे सलग १२ दिवसांच्या संततधार पावसानेसुद्धा तूर पिकाचे नुकसान झालेले नाही. ही एक चांगली बाब आहे.

प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टरवरील बेड मेकरची संख्या वाढलेली असून यामुळे दिसणारा चांगला परिणाम म्हणजे तूर पिकावर मर रोग किंवा आकस्मिक रोगाचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात दिसणार आहे.- ए. डी. चौंकडे, पेरणी मार्गदर्शक

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीतुराअमरावती