Join us

Sarangkheda Yatra : सारंगखेडा यात्रेत 137 घोड्यांची विक्री, दोन दिवसांत तब्बल 55 लाखांची उलाढाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:53 IST

Sarangkheda Yatra : नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar) सारंगखेडा यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी घोडे बाजाराने ५० लाखांचा टप्पा पार केला आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रेला (Sarangkheda Yatra) सुरवात झाली असून यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी घोडे बाजाराने ५० लाखांचा टप्पा पार केला आहे. रविवारी तब्बल ७४ घोड्यांची विक्री झाली. यात्रेत एकूण १३७ घोड्यांची विक्री झाली आहे. 

सारंगखेडा येथील घोडेबाजार (Ghode Bajar) हा भारतभर प्रसिद्ध असल्याने येथे जवळपास १५ पेक्षा अधिक राज्यांमधून घोडे विक्रेते आपले जातिवंत तसेच उमदे घोडे विक्रीसाठी आणत असतात. याच पार्श्वभूमीवर अश्वशौकीन देखील अश्व खरेदीसाठी मध्य प्रदेश, उडिशा, तमिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आदी राज्यांतून घोडे खरेदीसाठी येथे येत असतात. येथील घोडे बाजारात रविवार अखेर १,८०० घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रविवारी ७४ घोड्यांची विक्री झाली. 

या विक्रीतून २५ लाख ५० हजार रुपयाची उलाढाल येथील बाजारात झाली. एकूण १३७ घोड्यांची विक्री झाली आहे. या विक्रीतून ५५ लाख २३ हजार ५०० रुपयाची एकूण उलाढाल झाली आहे. बाजारात चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल घोडेबाजाराच्या माध्यमातून दरवर्षी होत असते. सारंगखेडा येथे भारतात सर्वात मोठा घोडेबाजार व चेतक फेस्टिवल भरत असतो. 

 २ हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी 

दरम्यान या बाजारात पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे २ हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी येतात, व त्यांना चांगले दाम मिळते. याची खात्री असते. त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात. एकेक अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून घेतला जातो. ५० हजारांपासून २१ लाखांपर्यंत घोड्यांच्या किंमती असतात. तसेच या ठिकाणी अनेक राज्यातून भाविक दत्ताच्या दर्शनासाठी तसेच घोडेबाजार पाहण्यासाठी, खरेदीसाठी येत असतात. 

 

पीक व्यवस्थापनापासून, शेतीच्या सर्व अपडेटसाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा...

 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनंदुरबारबाजार