Join us

कृषी, अन्नप्रक्रिया, फळप्रक्रियेला प्राधान्य, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कृषीविषयक बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 3:36 PM

कृषि पूरक उपाययोजनांसाठी भारत आणि न्यूझीलंड या देशात कृषीविषयक बैठक पार पडली. 

बाजारपेठांची उपलब्धता, बिगर-शुल्कासंबंधीचे अडथळे तसेच द्राक्षे, भेंडी आणि आंबा यासारख्या उत्पादनांसाठीच्या निर्जंतुकीकरण स्वच्छताविषयक तसेच वनस्पतींशी संबंधीत निर्जंतुकीकरण स्वच्छताविषयक उपाययोजना, सेंद्रीय उत्पादनांबाबतीतील परस्पर मान्य संचरनात्मक व्यवस्था, वाहनांसाठीची देशांतर्गत मानके समरूप असावीत यासाठी परस्पर मान्यता देण्याची सुलभ प्रक्रिया या सर्व गोष्टीवर भारत आणि न्यूझीलंड या देशात कृषीविषयक बैठक पार पडली. 

भारताच्या शिष्टमंडळाने वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या नेतृत्वाखाली 26 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत न्यूझीलंडला भेट दिली. या भेटीत या शिष्टमंडळाने दोन्ही देशांमधील सध्याचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी अनेक रचनात्मक आणि परिणामाभिमुख बैठका घेतल्या. न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले, न्यूझीलंडचे प्रभारी मुख्य अधिकारी तसेच परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार सचिव ब्रुक बॅरिंग्टन, भारत - न्यूझीलंड व्यापार परिषद आणि 11 वी भारत-न्यूझीलंड संयुक्त व्यापार समिती यांच्यात या बैठका झाल्या.

दरम्यान कृषीविषयक संबंध प्रस्थापित करण्यासाठी विचारमंथन करण्यात आले. यात द्विपक्षीय व्यापार आणि  परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी, परस्परांमधील आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी तसेच दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी, एकमेकांच्या नागरिकांमध्ये परस्पर व्यापार आणि उद्योगविषयक संपर्क वाढवून त्या माध्यमातून दोन्ही देशांमधील सध्याचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची ठरू शकतील अशा क्षेत्रांवरही प्राधान्याने चर्चा केली गेली. या बैठकांमध्ये बाजारपेठांची उपलब्धता तसेच आर्थिक सहकार्याशी संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच नवे उपक्रम हाती घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध संधींवरही चर्चा केली गेली.

कृषीसोबतच अन्नप्रक्रिया, फळप्रक्रिया आदींची चर्चा 

द्विपक्षीय आर्थिक संवादासाठी मजबूत संरचनात्मक व्यवस्था उभारणे तसेच कृषी, अन्न प्रक्रिया, गोदामे आणि वाहतूक, वनीकरण तसेच वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील मुख्य व्यापार आणि आर्थिक मुद्द्यांच्या बाबतीतली सध्याची परस्पर भागीदारी अधिक सुलभ चालावी यासाठी कार्यकारी गट स्थापन करण्यावरही या बैठकांमध्ये चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे या बैठकांमध्ये किवी फळ उत्पादन क्षेत्रासह एकूणच फलोत्पादन क्षेत्रातील (गुणवत्ता आणि उत्पादकता, गोदांममध्ये सुयोग्य आणि सुनियोजित साठवणूक आणि त्यांची योग्य नियोजित वाहतूक) तसेच दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील परस्पर सहकार्याबद्दलही चर्चा झाली. हे कार्यगट स्थापन झाल्यानंतर भारत आणि न्यूझीलंड नियमितपणे ठराविक कालांतराने या कार्यगटांच्या प्रगतीचा आणि त्यांनी केलेल्या शिफारशींचा आढावा घेतील.

टॅग्स :शेतीन्यूझीलंडशेती क्षेत्रमार्केट यार्ड