Join us

सातशे शेतकरी गटाचं नवं पाऊल, बाराशे एकरांत उभारणार सेंद्रिय शेती प्रकल्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 9:02 AM

700 शेतकरी गटाच्या माध्यमातून विषमुक्त धान्य व भाजीपाला पिकवला जाणार आहे.

रऊफ शेख

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील 1 हजार 250 एकर क्षेत्रात कृषी विभागाच्या वतीने सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात 700 शेतकरी गटाच्या माध्यमातून विषमुक्त धान्य व भाजीपाला पिकवला जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांना शासन अनुदान देणार असून  या अनुषंगाने गटप्रमुखांची बैठक घेण्यात आली.

शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यानुसार सदर योजनेंतर्गत तालुक्यात 1 हजार 250 एकर म्हणजेच 500 हेक्टर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली जाणार असून, 25 हेक्टरचा एक गट याप्रमाणे 20 शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. सदर गटामार्फत 500 हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून, या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने तपासले जाणार आहेत. त्यानंतर सेंद्रिय शेती करताना शेताच्या आजूबाजूला चर खोदणे, शेतात सेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन प्रशिक्षण, सेंद्रिय उत्पादित मालाच्या विक्रीचे व्यवस्थापन, सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला भेटी इत्यादी बाबी राबविल्या जाणार आहेत. 

कृषी विभागाचे निरीक्षक देणार शेतीला भेट

राज्य सरकारने कृषी विभागाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या एका शेतकऱ्याकडे किमान एक हेक्टर शेती असणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांने पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यत रासायनिक खते, कीटकनाशकाचा वापर न करता सेंद्रिय खताचा वापर करावा लागणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेतास वेळोवेळी कृषी विभागाचे निरीक्षक भेट देऊन तपासनी करणार आहेत. तसेच यातून काढण्यास आलेल्या उत्पन्नाला चांगली बाजारपेठ व चांगला भाव मिळून देण्यास शेतकरी व खरेदीदार यांच्यात सांग घालण्याचे काम प्रशासन करणार आहे.

सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्याचा कल

सेंद्रिय मालाला जागतिक स्तरावर होणारी मागणी आणि जमिनीची सुधारली जाणारी पत यामुळे सेंद्रिय शेती प्रत्येक शेतकऱ्यासाठी भविष्याची नांदी ठरणार आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाने ही योजना अमलात आणली आहे. तसेच सेंद्रिय शेती करण्यास शेतकरीही उत्सुक आहेत. येणाऱ्या काळात सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्याचा मोठा कल असेल. - भारत कासार, तालुका कृषी अधिकारी

सेंद्रिय शेती ही काळाची गरज

पारंपरिक पिकांमध्ये मिळत असलेले कमी उत्पादन, बाजारातील कमी भाव, यामुळे आता चाकोरीबद्ध शेतीच्या बाहेर पडण्याची गरज आहे. यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून ती फायदेशीर आहे. - प्रभाकर जाधव, प्रगतिशील शेतकरी

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीसेंद्रिय शेतीसेंद्रिय भाज्या