Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी मंजूर; पुढचा हप्ता कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:10 IST

मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे.

या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे.

त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या लाभार्थीना मिळाला नसून हा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे.

सहा महिन्यांपूर्वी, जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' घोषणा केली.

या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ या वयोगटातील २ कोटी ४६ लाख महिलांना आतापर्यंत दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. डिसेंबर महिन्याचे पैसेही २ कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले.

या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीत निधी नसल्याची ओरड विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी पुरेसा निधी शासनाकडे असून त्यातूनच लाभार्थ्यांना पैसे दिले जात असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

या योजनेसाठी जानेवारी महिन्यासाठी आवश्यक असलेला २६९० कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली असून येत्या २६ जानेवारीपूर्वी हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे या विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :लाडकी बहीण योजनेचामहिलाराज्य सरकारसरकारमंत्रीअदिती तटकरे