Join us

कापूस वेचणीसाठी मजुरांची वणवण! एका किलोला मोजावे लागतात ८ ते १२ रुपये

By दत्ता लवांडे | Updated: October 13, 2023 16:00 IST

बोंडे सडल्यामुळे त्यातून कापूस काढण्यासाठी जास्त त्रस्त..

यंदा मान्सूनच्या पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे खरिपाच्या सोयाबीन, कापूस, मूग , उडीद, मका यांसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर सप्टेंबर महिन्यात कापूस उमलायच्या वेळेस पाऊस पडल्याने पहिल्या टप्प्यातील कापूस वाया गेला आहे. त्यातच आता कापूस वेचणीसाठी लागणाऱ्या मजुरांचीही वणवण शेतकऱ्यांना भासू लागली आहे.

पावसाने कापसाचे बोंडे सडल्यामुळे त्यातून कापूस काढण्यासाठी जास्त त्रास आणि वेळही लागतो. तर पूर्णपणे उमललेला कापूस वेचण्यासाठी सोपा जातो. कामगारांकडून साधारणपणे ६ ते ७ रुपये किलो प्रमाणे कापूस वेचणीचे काम केले जाते. मात्र, सध्या बोंडे भिजल्यामुळे प्रत्येक कामगार ८ ते १२ रुपयांपर्यंत कापूस वेचणीचे काम करतो.

दरम्यान, दसरा आणि दिवाळी हे सण तोंडावर आल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांची कापूस वेचून विकण्याची घाई सुरू आहे. अनेक शेतकरी दसरा आणि लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर कापूस बाजारात नेत असतात. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कापसाचे क्षेत्र आहे. तर सध्या कापूस वेचणीसाठी शेजारच्या गावांतून मजुरांना आणावे लागत असून मजुरांच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जातात. मजूर उपलब्ध होत नसतील तर काही भागांत १२ रुपये किलोप्रमाणे तर मजूर उपलब्ध असल्यास आणि कापूस उमललेला असल्यास ६ ते ८ रुपये दर वेचणीसाठी आकारला जात आहे. 

आधीच हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी होत असून त्यातच कामगारांचा वेचणीचा भाव आणि मजुरांची कमतरता बघून शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

पावसामुळे कापसाचे बोंडे ओले झाले आहेत त्यामुळे कामगार कापूस वेचण्याचे काम नाकारतात. गरज असल्यामुळे कामगारांना जास्तीचे पैसे देऊन काम करून घ्यावे लागते. कधी कधी एका किलोला ६ तर खूपच अडचण असल्यास एका किलोला १२ रुपये देऊन काम करून घ्यावे लागते.-  दिलीप भोसले, शेतकरी (टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर)

टॅग्स :कापूसशेतकरीकॉटन मार्केट