Join us

"तुम्हाला फक्त बिबटे हवे असतील तर माणसांना गोळ्या घाला"

By दत्ता लवांडे | Published: October 30, 2023 10:08 PM

सोन्यासारखं लेकरू या आजोबांच्या डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

पुणे : "तुम्हाला बिबट्या पाहिजेत की माणसं? माझं सरकारला एवढंच मागणं आहे की, तुम्हाला जर माणसांपेक्षा बिबट्या जास्त महत्त्वाचे वाटत असतील तर माणसांना थेट गोळ्या घालून मारून टाका..." हा आहे शिवांशच्या कुटुंबियांचा रोष... सोन्यासारखं लेकरू या आजोबांच्या डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं.  शिवांशच्या जाण्यानं अवघं घर खायला उठलंय. बिबट्या हल्ला करायला वेळ पाहत नाही मग वनविभाग बिबट्यांना पकडायला का उशीर लावतंय? अजून किती जणांचे जीव गेलेले बघायचेत हा भाबडा प्रश्न शिवांशच्या कुटुंबियांनी केलाय. 

 पुणे जिल्ह्यातील जु्न्नर तालुक्यातील आळे येथील तीन वर्षांच्या शिवांश भुजबळ या चिमुकल्याला बिबट्याने हल्ला करून ठार केलं अन् अख्खं कुटुंब पोरकं झालं. एकुलतं एक लेकरू बिबट्याने नेल्याने कुणाकडे बघून जगावं अशी अवस्था या कुटुंबाची झालीये. घटना घडल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी आले, त्यांच्याकडून बिबट्याला पकडण्यासाठी तत्काळ पिंजरा लावण्यात आला, नेत्यांनी भेटी दिल्या, सहानुभूती दिली, कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली पण कुटुंबाने चिमुकला गमावला होता. डोळ्यादेखत झालेली काळीज पिळवटून टाकणारी घटना सांगताना आजोबांच्या डोळे डबडबले होते.

नऊ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते साडेचारची वेळ होती. शिवांशचे आजोबा घराच्या जवळच जनावरे चारत थांबले होते. शिवांश आजोबाकडे आला आणि त्यांच्याजवळ बसला. तेवढ्यात एक व्यक्ती गाडीवर आला आणि शिवांशला चॉकलेट देऊन गेला. आजोबा पुढे गेले अन् पापणी लवायच्या आत शेजारच्या उसात लपलेल्या बिबट्याने शिवांशवर हल्ला केला. वळून बघेपर्यंत बिबट्याने शिवांशला उसात ओढत नेलं होतं. आजोबा ओरडले अन् तेवढ्यात शेजारचा तरूण धावत बिबट्याच्या पाठीमागे उसात गेला. बिबट्याचा पाठलाग केला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. बिबट्या शिवांशवर बसून त्याच्या मांसाचे लचके तोडत होता. या दोघांना पाहून बिबट्या घाबरला, शिवांशला उचलल्यानंतर बिबट्या त्यांच्यावर धावून आला पण लगेच उसात निघून गेला. तेवढ्यात यांनी शिवांशला उचचले पण तोपर्यंत शिवांशचा जीव निघून गेला होता. 

खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात वावर होता. अनेकांनी वनविभागाकडे पिंजरा लावून बिबट्या पकडण्याची मागणी केली होती पण वनविभागाने गांभीर्याने घेतलं नाही. वनविभागाच्या दिरंगाईमुळे शिवांशचा जीव गेला असा दावा या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. घटनेनंतर वनविभागाने परिसरात तीन पिंजरे लावले. यामध्ये दोन बिबट्या पकडले गेले. पण परिसरात अजून बिबट्यांचा वावर असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येतंय. "बिबट्यामुळे आज आमचा चिमुकला गेला, बिबट्या हल्ला करायला वेळ पाहत नाही मग वनविभाग बिबट्यांना पकडायला का उशीर लावतंय? अजून किती जणांचे जीव गेलेले बघायचेत? जर सरकारला बिबट्या महत्त्वाचे वाटत असतील तर माणसांना गोळ्या घालून मारून टाका" अशी संतप्त भावना शिवांशच्या आजोबांनी व्यक्त केलीये. 

दरम्यान, मागच्या काही वर्षांमध्ये या परिसरातील बिबट्यांची संख्या वाढत आहे. पण वनविभागाकडून एका ठिकाणचा बिबट्या पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडण्यात येतो त्यामुळे त्यांची संख्याच कमी होत नाही असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. पिंजऱ्यांची उपलब्धता, वनविभागाचे नियम, पिंजरा लावण्यासाठी परवानगीची प्रोसेस या सर्व कारणांमुळे पिंजरा लावण्यास दिरंगाई होत असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. पण बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नाहक जाणारे जीव थांबतील का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

https://www.lokmat.com/agriculture/farming-ideas/what-precautions-should-be-taken-to-avoid-a-leopard-attack-farmer-a-a989/

टॅग्स :शेती क्षेत्रबिबट्याजुन्नरपुणेशेतकरी