Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारी पिकातील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 18:05 IST

ज्वारी हे अन्नधान्य व चारा देणारे उष्ण व समशीतोष्ण कटीबंधीय प्रदेशातील महत्वाचे पीक आहे. ज्वारी खालील क्षेत्र व उत्पादनात भारत देशामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. या पिकातील प्रमुख किडी व रोगांचा बंदोबस्त कसा करावा ते पाहूया.

ज्वारी हे अन्नधान्य व चारा देणारे उष्ण व समशीतोष्ण कटीबंधीय प्रदेशातील महत्वाचे पीक आहे. ज्वारी खालील क्षेत्र व उत्पादनात भारत देशामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. ज्वारी हे कमीत कमी निविष्ठांचा वापर करून विविध हंगामात व भौगोलिक परिस्थितीत सर्व हंगामात घेता येणारे पीक आहे. कमी पावसात धान्य व कडब्याचे हमखास उत्पादन देणारे पीक असल्यामुळे महाराष्ट्रात ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पावसाची अनियमितता, बदलते हवामान, वाढती लोकसंख्या, जनावरांना लागणारा चारा, जागतिक स्तरावरील इंधन समस्या या सर्व बाबींचा विचार करता ज्वारी हे बहुउपयोगी पीक आहे. या पिकातील प्रमुख किडी व रोगांचा बंदोबस्त कसा करावा ते पाहूया.

पीक संरक्षणलष्करी अळीचे व्यवस्थापनकामगंध सापळे ५/एकर व प्रकाश सापळ्यांचा वापर, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, जैविक किटकनाशक मेटा-हायझियम अॅनीसोप्ली ५ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

खोडमाशीचे व्यवस्थापनथायोमिथॉक्झाम (क्रुझर) ७० टक्के ३ ग्रॅम प्रति किलो किंवा इमीडाक्लोप्रीड ४८ टक्के एफ एस ची १४ मि.ली. प्रति किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया केल्यास  खोडमाशीमुळे होणारी पोंगे मर कमी होऊन आर्थिकदृष्टया अधिक फायदा होतो.

अधिक वाचा: लसूण उत्पादन वाढीसाठी लागवडीचे तंत्रज्ञान

मावा किडीचे व्यवस्थापनरब्बी ज्वारीवरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी किडीचा प्रादूर्भाव दिसताच थायोमिथॉक्झाम २५ टक्के दाणेदार १५० ग्रॅम ५०० लिटर पाणी किंवा इमिडॅक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही १४० मिली ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

खोडकिडीचे व्यवस्थापनखोल नांगरणी केल्याने जमिनीतील खोड किड्याचे कोष नष्ट होण्यास मदत होते. १० टक्के पेक्षा जास्त झाडाच्या पानावर छिद्रे किंवा ५ ते १० टक्के पेक्षा जास्त पोंगेमर दिसुन येताच क्लोरोपायरीफॉस २५ टक्के प्रवाही, २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रोग व्यवस्थापनखडखड्या (चारकोल रॉट) रोगाचे व्यवस्थापन- पिकाची फेरपालट करावी म्हणजेच दरवर्षी त्याच जमिनीवर रब्बी ज्वारीचे पीक घेऊ नये.हलक्या जमिनीवर कोरडवाहू पध्दतीने पेरणी करताना खडखड्या रोगास प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा.पीक फुलोरा अवस्थेत असताना शक्य असल्यास पाण्याची एक पाळी द्यावी.खताची योग्य मात्रा देऊन सुध्दा या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.

काणी व्यवस्थापन१ किलो ज्वारीच्या बियाण्यास ४ ग्रॅम (३०० मेश) गंधकाची भुकटी किंवा ३ ग्रॅम थायरम बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया केली असता रोगाचे नियंत्रण होते. पी.जे. ७ के, आणि पी.जे. २३ के हे रोगप्रतिबंधक वाण पेरणीसाठी वापरावेत.

काळा गोसावी व्यवस्थापनरोगाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतातील रोगट झाडे दिसताच काळजीपुर्वक काढून घ्यावीत व प्लॅस्टिकच्या पिशवीत गोळा करावी. काळी पावडर जमिनीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. ही जमा केलेली रोगट कणसे शेताबाहेर जाळून नष्ट करावी. पिकाची फेरपालट करावी. पिकाची काढणी केल्यानंतर खोल नांगरणी करावी.

- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

टॅग्स :ज्वारीकीड व रोग नियंत्रणपरभणीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ