Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीची झाली गटारगंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 12:58 IST

आषाढी वारी जवळ आली, तरी इंद्रायणी नदीची स्वच्छता झालेली नसून सध्या वारकऱ्यांना रसायनयुक्त खराब पाण्यात स्नान करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.

अवघ्या वारकरी संप्रदायाचे ऊर्जास्रोत असणाऱ्या श्री क्षेत्र देहूगाव आणि श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी गटारगंगा झाली आहे. निर्ढावलेले अधिकारी, ढिम्म शासनव्यवस्था आणि असंवेदनशील राजकारणी यांना इंद्रायणीचे दुःख समजत नाही. नदी सुधारचे ढोल बडविण्यातच राजकारणी धन्यता मानत आहेत. नदीसुधार सोपकर ठरत आहे. इंद्रायणी स्नान महिमा संतांनी सांगितला आहे, 'इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा।। तुटती यातना सकळ त्यांच्या ।।' प्रदूषणामुळे 'इंद्रायणी स्नान करिती, त्यांना यातनाच मिळती सकळ !" असे उद्विग्नपणे म्हणण्याची वेळ आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातून इंद्रायणी नदी वाहते. लोणावळ्यातील कुरवंडे या उगमस्थानापासून ते तुळापूर संगम अशा शंभर किलोमीटरच्या पात्राच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नदी प्रदूषणात भर पडत आहे. त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, चाकण एमआयडीसी पिंपरी- चिंचवड महापालिका गांभीर्याने पाहत नसल्याबाबत वारकरी संप्रदायांकडून संताप व्यक्त होत आहे.

काय आहे वारकरी जीवनात इंद्रायणीचे महत्त्व ! 'यात्रे अलंकापुरा येती । ते आवडती विठ्ठला ।।१।। पांडुरंगे प्रसन्नपणे । दिधले देणे हे ज्ञाना ।।२।। भुवैकंठ पंढरपुर । त्याहुनी थोर महिमा या ।।३।।'

या संत निळोबाराय यांच्या वचनानुसार 'म्हणे जाणूनी संता धावत येती प्रतिवर्षी" या अभंगानुसार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी कार्तिकी वारीसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. पवित्र इंद्रायणी स्नान ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे डोळे भरून दर्शन घेत असतात, तर 'माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥१॥ पांडुरंगी मन रंगले ।' असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारीचे महत्त्व विशद केले आहे.

कार्तिकी आणि आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणावर वारकरी अलंकापुरात येतात. मात्र, प्रदूषणामुळे पवित्र इंद्रायणी आता गटारगंगा झालेली आहे. त्यामुळे 'इंद्रायणी स्नान करिता प्रदक्षिणी, तुटती यातना सकळ त्यांच्या' याऐवजी आता प्रदूषणामुळे 'इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ' अशी अनुभूती येत आहे.

जबाबदारी कोणाची ? इंद्रायणी नदीच्या काठावर आळंदी, देहू, तुळापूर अशी प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. तेथे लाखो वारकरी येतात. इंद्रायणीस्नान, नगरप्रदक्षिणा, माउलींचे दर्शन असा वारकऱ्यांचा अलिखित नियम आहे. इंद्रायणी सातत्याने फेसाळली आहे. मात्र, कारण सापडत नाही. विविध पर्यावरणवादी संघटना, वारकरी संघटना, देहू- आळंदी देवस्थान, नगरपालिका आणि महापालिका यांच्या वतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र शासन यांना प्रदूषण रोखावे यासाठी गाऱ्हाणे घातले जात आहे. मात्र, त्या मागणीकडे कोणीही गंभीरपणे पाहत नाही. त्यामुळे आषाढी पालखी सोहळा आला तरी इंद्रायणी फेसाळलेलीच आहे, तर फेसाचे पाणी साबणाचे आहे. याचा कयास प्रदूषण नियंत्रण मंडळाने लावला आहे.

टॅग्स :आषाढी एकादशीची वारी 2022इंद्रायणीआळंदी