Join us

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ऊस शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा तिढा सुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:30 AM

राज्य शासनाने या रकमेची आचारसंहितेपूर्वीच मान्यता देऊन तरतूद केल्याने येत्या आठ दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

राजाराम लोंढेकोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा गुंता अखेर सुटला आहे. परतफेडीच्या कोणत्या वर्षातील व एकच वर्षात दोनदा उचल असली तरी त्यातील कोणती रक्कम ग्राह्य धरायची, याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले होते.

त्याचे स्पष्टीकरण बुधवारी शासनाने दिल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला. पण, कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कर्ज उचल व परतफेडीचा कालावधी वित्तीय संस्थांशी सुसंगत नसल्याने १४ हजार २८९ शेतकरी अपात्र ठरले होते.

शासनाने निकषात बदल करून एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतल्याने मार्ग मोकळा झाला होता. पण, काही शेतकऱ्यांनी २०१७- १८ व २०१८-१९, तर २०१८-१९ व २०१९-२० मध्ये उचल व परतफेड केलेल्यांना कोणत्या वर्षातील रकमेचा लाभ द्यायचा?

त्याचबरोबर २०१७-१८ या एकाच वर्षात दोनदा उचल व परतफेड केली असेल व त्यांनी पुढच्या दोन वर्षात उचलच केली नसेल तर कोणती रक्कम ग्राह्य धरायची? असा गुंता सहकार विभागापुढे तयार झाला होता. याबाबत उपनिबंधक कार्यालयाने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले होते.

बुधवारी २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षातील २०१८-१९, तर २०१८-१९ व २०१९-२० वर्षातील २०१९-२० वर्षातील रकमेचा लाभ देण्याचे स्पष्ट केले आहे.

चौदाशे शेतकऱ्यांची एक वर्षात दोनदा उचलसहकार विभागाने निश्चित केलेल्या तीन वर्षांपैकी केवळ २०१७-१८ या वर्षातच दोनदा उचल करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १,४०० इतकी आहे.

आठ दिवसांत खात्यावर पैसेराज्य शासनाने या रकमेची आचारसंहितेपूर्वीच मान्यता देऊन तरतूद केल्याने येत्या आठ दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

शासनाकडून स्पष्टीकरण मिळाल्याने आजच यादी पाठवत आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - नीलकंठ करे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर)

टॅग्स :पीक कर्जशेतकरीशेतीऊसराज्य सरकार