Join us

ICAR Day: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मॉडेल फार्म्स तयार करण्याची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 09:56 IST

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे ९६व्या भारतीय कृषी संशोधन परिषद स्थापना  आणि तंत्रज्ञान दिन २०२४ चे उद्घाटन केले.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे ९६व्या भारतीय कृषी संशोधन परिषद स्थापना  आणि तंत्रज्ञान दिन २०२४ चे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी २५ प्रकारची रोपे जारी केली आणि काही उत्पादने शेतकऱ्यांना समर्पित केली. यावेळी पशु आणि मत्स्य शेतीसाठी लसीकरण किटचे, तसेच शेतीमधील पिकांच्या अवशेषापासून बनवलेल्या विविध उत्पादनांचेही प्रकाशन करण्यात आले.

आपल्या देशात अनेक अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्यासाठी मॉडेल फार्म्स तयार करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, शेतकरी हा तिचा कणा आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, शेतकरी आणि शेती हे पंतप्रधानांचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

शेतीमध्ये वैविध्य आणले तर शेतीमधून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शक्य होईल. आज आम्ही हा संकल्प घेऊन काम करत आहोत. २०४७ साला पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साधण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून, यामध्ये कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्र महत्वाची भूमिका बजावतील. पशुपालन, मत्स्यपालन, गहू उत्पादन, डाळी आणि तेलबिया या क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढीसाठी काम करावे लागेल.

शेतकरी आणि शास्त्रज्ञ एकमेकांशी जोडले जावेत, यासाठी काम करण्यावर शिवराज सिंह चौहान यांनी भर दिला. विज्ञानाचा प्रत्यक्ष प्रयोग केल्याशिवाय शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. शेतकरी आणि कृषी विज्ञान केंद्र किती जोडले गेले आहेत, याचे विश्लेषण करावे लागेल.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह म्हणाले की, आपण मत्स्यपालनात जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचलो आहोत. आज आपण ६३ हजार कोटी रुपये किमतीच्या मालाची निर्यात करत आहोत. जर आपण पशुधन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन दिले, तर त्याचा खूप फायदा होईल.

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर म्हणाले की, आपण कृषी क्षेत्र आणि उत्पादन वाढीवर खूप काम केले, मात्र उत्पादित धान्य साठवण्याची व्यवस्था केली नाही.

ठाकूर म्हणाले की, धान्योत्पादनाच्या साठवण व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करायला हवे. शेतीला बिनविषारी खतांची गरज असून शास्त्रज्ञांनी या दिशेने संशोधन करायला हवे, जेणे करून मानवाला विषारी अन्न धान्य मिळणार नाही. खते शेतीसाठी उपयुक्त ठरायला हवीत, असे ते म्हणाले.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात आयसीएआरचे काम दिसून येत आहे. नॅनो युरिया तयार केल्यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हायला मदत होईल.

कृषी आणि कृषक कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी म्हणाले की, १४० कोटी लोकांचे पोट भरणाऱ्या देशातील शेतकऱ्यांची काळजी घेतली नाही, तर भविष्यात मोठी समस्या निर्माण होईल. केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन म्हणाले की, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासळी उत्पादक देश आहे.

टॅग्स :केंद्र सरकारशेती क्षेत्रशेतकरीशेतीपीकशिवराज सिंह चौहानमंत्री