Join us
Daily Top 2Weekly Top 5

तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या कसे कराल व्यवस्थापन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 07:36 IST

तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत असलेले थंड हवामान व मागील काही दिवस असलेले ढगाळ वातावरण हे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे.

तूरपीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत असलेले थंड हवामान व मागील काही दिवस असलेले ढगाळ वातावरण हे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आढळून आला असून, उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी पिकाचे निरीक्षण करून शेंगा पोखरणाऱ्या अळीकरिता एकात्मिक व्यवस्थापनासंबंधी उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे आवाहन विषय विशेषज्ञ डॉ. नीलेश वझिरे, वरिष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. जीवन कातोरे यांनी केले आहे.

पिसारी पतंगअंड्यातून बाहेर निघलेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून खातात. पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे खाते.

शेंग माशीया माशीची अळी लहान, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून, तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगांच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतुडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकणी होते व पिकाचे अतोनात नुकसान करते.

हेलीकोव्हर्पाया किडींची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर पिवळसर पांढऱ्या रंगाची अंडी घालतात. पूर्ण वाढ झालेली ही अळी ३० ते ४० मि.मी. लांब हिरवट, पोपटी व करड्या रंगाची असून, तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. या अळ्या शेंगांना अनियमितपणे मोठ्या आकाराचे छिद्र पाडून शेंगेच्या आतील अपरिपक्च तसेच परिपक्च दाणे खाऊन नुकसान करते. ही कीड तुरीवर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत क्रियाशील असते. डिसेंबर-जानेवारीमध्ये ढगाळ वातावरण असल्यास या कीडीचा प्रादुर्भाव वाढतो.

कसे करावे एकात्मिक व्यवस्थापन- या तिन्ही किडी कळ्या, फुले व शेंगांवर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनासाठी जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात.- यासाठी पूर्ण वाढ झालेल्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. हेक्टरी २० पक्षीथांबे पिकामध्ये उभारावेत.- अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील, त्या गोळा करून नष्ट कराव्यात.

पहिली फवारणीपीक ५० टक्के फुलोरावस्थेत असतांना ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझॅडीरेक्टिन ३०० पीपीएम ५० मिलि किंवा अझॅडीरेक्टिन १५०० पीपीएम २५ मिलि किवा एचएएनपीव्ही (१ x १०९ तीव्रता) ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क प्रती हेक्टरी फवारावा किंवा क्वीनॉलफॉस २५ ई.सी. २० मिलि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

दुसरी फवारणी(पहिल्या फवारणी नंतर १५ दिवसांनी) इथिऑन ५० टक्के ई.सी. २० मिलि किंवा लॅमडा सायहलोथ्रिन ५ टक्के १० मिलि किंवा फ्लूबेंडामाइड ३९.३५ एससी २ मि.लि किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ई.सी. ७ मि.लि. किवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के एस.जी. ४ ग्राम किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. ३ मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

टॅग्स :तूरपीककीड व रोग नियंत्रण