Join us

यंदाच्या खरीपात राज्यात किती पेरणी झाली? खतांची उपलब्धता कशी आहे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 10:36 AM

यंदाच्या खरिपात पाऊस उशिरा सुरू झाला असला, तरी आतापर्यंत पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र ३७६ महसूल मंडळांमध्ये पावसाचा २१ दिवसांपेक्षा अधिक खंड पडला आहे.

१ जून ते दि.28 ऑगस्ट या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान 796.8 मिमी असून या खरीप हंगामात दि.28.08.२०२३ पर्यंत प्रत्यक्षात 675.4 मिमी (दि.28 ऑगस्ट पर्यंतच्या सरासरीच्या 85%) एवढा पाऊस पडलेला असल्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली आहे.

एकूण पेरणीचे क्षेत्र

खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून दि.28.08.२०२३ अखेर प्रत्यक्षात १39.84 लाख हेक्टर (98 टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पुर्ण झालेली आहेत. दि.28.08.2023 रोजीपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.28 लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.08 लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची 11.15 लाख हे. मका पिकाची 9.00 लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची 14.96 लाख हे. क्षेत्रावर पुर्नलागवड झाली आहे.

पाऊसमान

राज्यामध्ये दि.25 जुलै-2023 ते आज दि.28.08.2023 अखेर 484 महसूल मंडळामध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 376 महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.

बियाणांची स्थिती

खरीप हंगाम २०२३ करीता १९.२१लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विं.बियाणे उपलब्ध होते.  त्यानुसार राज्यात १९,७२,१८२ क्विंटल (१०२%) बियाणे पुरवठा झालेला आहे.

खतांची स्थिती

खरीप हंगाम 2023 करिता राज्यास 43.13 लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून  आतापर्यंत 57.57 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी 36.48 लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात 21.09 लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

पीक स्पर्धा

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 1१ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   त्यापैकी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१  ऑगस्ट २०२३ ही पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून  जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मा. आयुक्त कृषी श्री. सुनील चव्हाण यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना केले आहे. 

टॅग्स :खरीपशेतकरीमोसमी पाऊसशेती