अहमदाबादमध्ये रासायनिक हल्ला घडवून आणण्याचा एक प्रकार भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीनं दहशतवादविरोधी पथकानं उघडकीला आणल्याच्या बातमीमुळे नुकतीच मोठी खळबळ माजली.
या बातमीमध्ये रिसीन नावाच्या विषारी पदार्थाचा तसंच एरंडीच्या बियांचा उल्लेख झाल्यामुळे अनेक जणांच्या पोटात भीतीचा गोळाच उठला असेल.
याचं कारण म्हणजे एरंडीचं तेल तर उत्तम औषध म्हणून पिण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो; मग अचानकपणे औषधाचं रूपांतर विषामध्ये कसं झालं? त्यामागचं नेमकं वैज्ञानिक सत्य काय आहे? याचा उलगडा करण्याचा हा प्रयत्न.
एरंडीचं तेल उत्तम रेचक मानलं जात असलं तरी एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर शिल्लक राहिलेले पदार्थ मात्र अत्यंत घातक असतात. या घातक पदार्थावर प्रक्रिया केल्या तर त्यांच्यापासून अत्यंत जहाल विष तयार होऊ शकतं.
कारण एरंडीच्या बियांमध्ये नैसर्गिकरीत्याच रिसीन नावाचा घातक पदार्थ असतो. बिया त्यांच्या मूळ स्वरूपात असतात तोपर्यंत कसलाच धोका नसतो. जर यातून रिसीन बाहेर पडलं तर मात्र ते जीवघेणं ठरू शकतं.
एरंडीच्या बियांपासून केलेलं तेल घातक नसतं. रिसीन या तेलात मिसळू शकत नाही. तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या गाळामध्ये रिसीन मागेच राहतं.
साहजिकच हा गाळ खूप काळजीपूर्वकरीत्या नष्ट करावा लागतो. रिसीनच्या या गुणधर्मामुळे विघातक कारवाया करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी रिसीनकडे आकर्षित होणं स्वाभाविकच आहे.
आपल्या शरीरामध्ये अव्याहतपणे सुरू असलेल्या प्रथिनांच्या निर्मितीचं काम ठप्प करणारी घातक शक्ती; असं रिसीनचं वर्णन करता येईल. आपल्या शरीरामधली प्रत्येक पेशी जणू एखाद्या अतिसूक्ष्म कारखान्यासारखंच सतत काम करत असते.
या पेशीमध्ये प्रथिनांची निर्मिती होत राहते. शरीरामध्ये प्रथिनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक असतात. स्नायूंच्या मदतीनं हालचाल करता येणं, रक्तामध्ये प्राणवायू मिसळणं, अवयव नीटपणे काम करणं या सगळ्यांसाठी प्रथिनांची गरज असते.
हे काम होऊ नये, यासाठी रिसीन आपल्या शरीराच्या पेशींमध्ये घुसतं आणि तिथे प्रथिनं तयार करत असलेली यंत्रणाच उद्ध्वस्त करून टाकतं. साहजिकच प्रथिनांची निर्मिती करणं आता आपल्या शरीरातल्या पेशींना अशक्यप्राय होतं.
ज्या कामासाठी पेशी जन्मलेली असते तेच काम तिच्याकडून होत नसेल तर अशा पेशीचं मुळात अस्तित्वच बिनकामी ठरतं. साहजिकच अशी पेशी मरून जाते.
अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आपल्या शरीरातल्या पेशींचा नाश व्हायला लागल्यावर आपल्या शरीरामधल्या अवयवांचं कामकाज मंदावतं आणि लवकरच ते ठप्पच होऊन जातं. साहजिकच रिसीन माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरतं.
एरंडीला उष्ण तपमान पूरक असल्यामुळे भारतासारख्या देशात त्याची मोठ्या प्रमाणावर पैदास होऊ शकते. साहजिकच त्याच्या उत्पादनावर आणि वापरावर नियंत्रण ठेवणं काहीसं अवघड ठरू शकते.
तसंच एरंडीच्या बीची फार काळजी न घेतासुद्धा अगदी प्रतिकूल वातावरणातही एरंडीची वेगाने वाढ होते. यासाठी मातीची परिस्थितीसुद्धा अगदी आदर्श असण्याची गरज नसते. फक्त हिमवृष्टी होत असलेल्या भागांमध्ये मात्र एरंडी उगवू किंवा वाढू शकत नाही.
एरंडीच्या बियांमध्येच रिसीन असल्यामुळे या बिया कुठेही पसरू नयेत किंवा त्या कुणाच्या हाती लागू नयेत, याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. चुकून कुणी या बिया खाल्ल्या तरी हे घातक ठरू शकतं.
या बिया हाताळत असलेल्या लोकांनीही हातमोजे वापरणं, चेहरा झाकणं, नंतर आपले हात अतिशय स्वच्छ धुणं अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे.
तांत्रिकदृष्ट्या रिसीनच्या गैरवापराद्वारे केलेल्या हल्ल्याला जैविक हल्ला म्हणायचं का रासायनिक हल्ला; असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. रिसीन है एरंडीच्या बियांमध्ये आढळत असल्यामुळे त्यांना जैविक हल्ला म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल; असं वरकरणी वाटू शकतं.
प्रत्यक्षात मात्र रिसीन हे जिवाणू, विषाणू यांच्यासारख्या 'जिवंत' रूपात आढळत नसल्यामुळे त्याला जैविक वर्गात धरलं जात नाही. त्याचं विश्लेषण 'घातक रसायन' असं शास्त्रज्ञ करत असल्यामुळे त्याच्या गैरवापरातून होत असलेल्या हल्ल्यालासुद्धा आपण 'रासायनिक हल्ला'च म्हटलं पाहिजे.
जरी रिसीनच्या मुळाशी एरंडीचं बी असेल तरी रिसीन हे जैविक प्रकारचं नसणं, हे यामागचं कारण आहे, असा निष्कर्ष आपण काढू शकतो.
- अतुल कहातेविज्ञानाचे अभ्यासकakahate@gmail.com
अधिक वाचा: गाईच्या पोटात सापडली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी; काय हाय विषय? वाचा सविस्तर
Web Summary : Castor oil, a common medicine, can be turned into a deadly poison called Ricin. Ricin, found in castor seeds, disrupts protein production in cells, leading to organ failure and death. Though castor plant is easily available, controlling Ricin production is critical to prevent its misuse as a chemical weapon.
Web Summary : अरंडी का तेल, एक आम दवा, रिसिन नामक घातक जहर में बदला जा सकता है। अरंडी के बीजों में पाया जाने वाला रिसिन कोशिकाओं में प्रोटीन उत्पादन को बाधित करता है, जिससे अंग विफलता और मृत्यु हो जाती है। अरंडी का पौधा आसानी से उपलब्ध होने के बावजूद, रासायनिक हथियार के रूप में इसके दुरुपयोग को रोकने के लिए रिसिन उत्पादन को नियंत्रित करना महत्वपूर्ण है।