Join us

आता सरसकट हार्वेस्टर! तुर काढणीची झोड पद्धत नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 15:20 IST

राज्यात तुर काढणीला वेग... शेतकऱ्यांच्या शेतात सोंगलेल्या तुरींचे ढिग दिसून येत आहेत.

- रविंद्र शिऊरकर

मराठवाड्यात विविध भागात सध्या तुर काढणी जोमात सुरु आहे. पूर्वी तुरीला काढण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपरिक झोड पद्धत हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पारंपरिक मळणी यंत्राद्वारे तुर तयार करताना लागणाऱ्या मजूरांची गरज आता शेतकऱ्याला फारशी लागत नसल्याचे चित्र आहे. या मळणीला तीन ते चार मजुरांची गरज भासत असल्याने शेतकरी हार्वेस्टरसारख्या यंत्राने विनाकष्ट तूर काढताना दिसून येत आहेत.

खरिपात लागवड झालेली तुर सध्या पूर्णपणे काढणीस तयार झाली आहे. राज्यात आता तुर काढणीला वेग आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सोंगलेल्या तुरींचे ढिग दिसून येत आहेत. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांची तूर पूर्ण गेली तर काही भागात तुर काळी पडली आहे. पारंपरिक झोड पद्धत नामशेष 

तुर सोंगुन त्याचा ढीग करणे त्यानंतर तुरीचे एक - एक झाड लाकडाच्या ठोकळ्यावर झोडत तुर तयार केली जाते. या पद्धतीला झोड पद्धत असे म्हणतात यात कष्ट फार लागत असल्याने अलीकडे ही पद्धत नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या झोड पद्धतीद्वारे तयार होणाऱ्या तुरी मध्ये तुरीच्या दाण्यांची गुणवत्ता टिकून राहत असून सोबत दाण्यांचा चुर होत नाही. तसेच याद्वारे मिळणाऱ्या तुरीच्या भुसात कांड्यांची मात्रा आढळत नसल्याने जनावरे हे भुस आवडीने खातात.

गाय, बकरी घरी असल्यास त्यांच्या चाऱ्यासाठी मळणी यंत्राद्वारे किंवा झोड पद्धतीने तुर तयार केली जाते. ज्यातून मिळणारे तुरीचे भुस साठवून ते पावसाळ्याच्या काळात जनावरांना वैरणीत दिले जाते. 

कोरडवाहू तुरींच्या उत्पन्नात घट 

या वर्षी कमी पावसामुळे तुरीची वाढ काही अंशी कमीचं होती त्यात ऐन तुरी पिकात दाणा भरण्याच्या वेळेस पावसाने दडी दिल्याने तुर दाणा पूर्णपणे वाढलेला नाही. परिणामी, कोरडवाहू शेतकऱ्यांना वजनात आणि उत्पन्नात घट झाली.

 

टॅग्स :तुराकाढणीपीक