Join us

Vitthal Darshan शेतकरी वारकऱ्यांना आनंदाची बातमी, २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:54 AM

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. सध्या गर्भगृह अन् चारखांबीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या आजूबाजूला लावण्यात आलेले बुलेटप्रूफ काचेचे आवरण काढण्यात आले आहे.

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. सध्या गर्भगृह अन् चारखांबीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या आजूबाजूला लावण्यात आलेले बुलेटप्रूफ काचेचे आवरण काढण्यात आले आहे. काम पूर्ण होताच २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू करणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

पंढरपूर येथे मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख-जळगावकर, अॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले उपस्थित होते.

यावेळी औसेकर म्हणाले, मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार आराखड्यातील प्रस्तावित कामांपैकी बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी, सभामंडप व इतर ठिकाणी काम सुरू आहे. २ जूनपर्यंत गर्भगृह अन् चौखांबीचे काम पूर्ण होईल.

त्यामुळे २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे. त्याचबरोबर देवाच्या बंद असलेल्या नित्यपूजाही सुरू होणार आहेत. पाद्यपूजा व तुळशीपूजा चालू होणार आहेत. २ ते ९ जून या दरम्यान राहिलेल्या उटीपूजा होणार आहेत.

विठ्ठलाच्या सभा मंडपाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे ३० जून रोजीच सभा मंडप समितीच्या ताब्यात मिळणार आहे. ३० जूननंतर सभामंडपातून विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू होईल.

आषाढी यात्रेपूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील आवश्यक व राहिलेली छोटी-छोटी कामे पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. तसेच आषाढीपूर्वीच गरुड खांबाला चांदी लावण्यात येणार असल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

७ जुलैपासून विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरू७ जुलै रोजी देवाचा पलंग काढण्यात येणार आहे आणि तेव्हापासूनच श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

टॅग्स :पंढरपूरपंढरपूर वारीआषाढी एकादशीची वारी 2022शेतकरी