Join us

शेतकऱ्यांना सोयाबीनवरील मोझॅकचे अनुदान काही मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 4:19 PM

पंचनामे होऊन उलटली सहा महिने

जब्बार चीनी

यववतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकुज व मूळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. पंचनामे होऊन सहा महिने झाले तरीही अनुदान मिळेना आणि निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या प्रशासनाला व निवडणूक प्रचारात व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींना या बाधित शेतकऱ्यांची आठवण होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अवकाळीने उत्पन्नातही मोठ्या प्रमाणावर घट झाली. याबाबत नुकसानीचे तातडीने संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. त्यानंतर महसूल, पंचायत व कृषी विभागाने संयुक्त पंचनामेही केले. त्यानुसार तालुक्यातील १४० गावांतील पाच हजार ४०० हेक्टरवरील सोयाबीनच्या पिकांचे नुकसान होऊन सात हजार ६०० शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला, असा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला.

तालुक्यात हे प्रमुख पीक आहे. यंदा खरीप हंगामात ११ हजार ५४२ हेक्टरवर सोयाबीन लागवड करण्यात आली. परंतु खरीप हंगामामध्ये पडलेला पावसाचा खंड, सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस, तापमानात झालेला बदल, तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग आणि खोडकुज व मूळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला. त्यांनतर महसूल, पंचायत व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे केले.

केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीक विमा योजना अंमलात आणली आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीकविमा काढला होता. विमा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही देखील उदासीनता दाखवली.

बाधितांना मदतीची प्रतीक्षा

या झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यानुसार तालुक्यात १४० गावांतील सात हजार ६०० हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सात हजार ६०० शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. वणी तालुक्यातील २१ हजार १४१ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. त्यापैकी केवळ तीन हजार ५०० शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली. त्यातही काही शेतकऱ्यांच्या खात्यात शंभर रुपयापेक्षा कमी रक्कम जमा झाली.

टॅग्स :सोयाबीनपीक विमाशेतीशेतकरी