Join us

तूरीच्या काढणीला वेग, एकरी उतारा घटल्याने शेतकरी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 2:08 PM

तूर कापणीसाठी सध्या तीनशे रुपये रोजंदारी दिली जात आहे.

खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव परिसरात यावर्षी दुष्काळी स्थितीमुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीला कमी उतारा मिळत आहे. परिसरात सध्या तुरीच्या काढणीला वेग आला असून एकरी केवळ ३ ते ४ क्विंटल तूर होत असल्याने शेतकरी नाराज आहेत.

परिसरात दरवर्षीपेक्षा यंदा कमी प्रमाणात तुरीची पेरणी झाली होती. शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक वाया गेल्यामुळे रबी आणि खरिपाच्या जोडावर तुरीचे पीक घेतले आहे. तुरीची बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांनी तीन फूट अंतरावर (दोन-ओळी) अशी पेरणी केली होती. पावसाने हुलकावणी दिल्याने तुरीलाही मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे.

शिवारातल्या तूरीला धुक्याचा फटका, फवारणीला आला वेग

अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या मशीनद्वारे तूर तयार करण्याऐवजी तुरीची कापणी करून छोट्या मशीनद्वारे तूर करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे मजुरांनाही काम उपलब्ध होत आहे. तूर कापणीसाठी सध्या तीनशे रुपये रोजंदारी दिली जात आहे.

तूर काढणी यंत्रालाही  काम कमी

यंदाच्या वर्षी तालुक्यात कमी प्रमाणात तुरीची पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, पावसाअभावी पीक वाया गेले आहे. जेथे आहे तेथेही तुरीला कमी उतारा मिळत असून केवळ ३ ते ४ क्चिटल उत्पादन मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे, तर तूर काढणाऱ्या मळणी यंत्राला तूर करण्याचे कामही कमी प्रमाणात मिळत आहे. - लक्ष्मण दुधारे, मळणीयंत्र मालक,गल्लेबोरगाव

बियाणे, पेरणी, खत, तण व्यवस्थापन, खुरपणी, कापणी. मशीनद्वारे करणे आणि मिळालेले उत्पादन यांचा मेळ बसणे अवघड झाले आहे. त्यामुळे तुरीचे उत्पन्न यावर्षी परवडले नाही. -प्रेमचंद राजपूत, शेतकरी, गल्लेबोरगाव

टॅग्स :तुराबाजारशेतकरी