Join us

Crop Insurance : राज्याच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना विमा भरपाई नाही! खरिपाचे २२१९ कोटी अजूनही प्रलंबितच

By दत्ता लवांडे | Updated: March 19, 2025 20:55 IST

एकूण मंजूर २ हजार ३०० कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ ९६ कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून अद्याप २ हजार २१९ कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. राज्य सरकारने वेळेत हप्ता दिला असता तर शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातच विमा भरपाई मिळाली असती.

Pune : रब्बी हंगाम संपत आला असूनही खरीप हंगाम २०२४ मधील पीकविमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण मंजूर २ हजार ३०० कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ ९६ कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात आले असून अद्याप २ हजार २१९ कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. राज्य सरकारने वेळेत राज्य हिस्सा विमा कंपन्यांना वर्ग केला असता तर शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यातच विमा भरपाई मिळाली असती.

दरम्यान, कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात खरीप हंगामातील विविध ट्रीगरसाठी किंवा बाबींसाठी ५७ लाख २५ हजार ८८२ अर्जांसाठी २ हजार ३१६ कोटी रूपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. पण त्यातून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीसाठी  केवळ ३ लाख ८ हजार ८७७ अर्जांपोटी ९६ कोटी २८ लाख रूपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. 

स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकुल परिस्थिती या दोन ट्रीगरसाठी अनुक्रमे १ हजार ४५५ कोटी ४३ लाख आणि ७०५ कोटी ८४ लाखांची भरपाई मंजूर झाली आहे. यासोबतच काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित या दोन बाबींसाठी अनुक्रमे १४१ कोटी २० लाख आणि १३ कोटी ५५ लाख रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. 

एकूण २ हजार ३१६ कोटी २ लाख विमा भरपाई मंजूर करण्यात आली असून त्यातील ९६ कोटी २८ लाख रूपये भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. तर २ हजार २१९ कोटी ७४ लाख विमा भरपाई अद्यापही प्रलंबितच आहे. 

राज्य सरकारकडून दिरंगाईराज्य सरकारने राज्य हिस्सा विमा कंपन्यांच्या खात्यावर जमा न केल्यामुळे पीकविमा प्रलंबित आहे. हा विमा हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्येच विमा कंपन्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित होते पण तसे न घडल्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सरकारने वेळेत विमा हप्ता जमा केला असता तर शेतकऱ्यांना खरीप २०२४ची विमा भरपाई डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच मिळाली असती अशीही माहिती समोर आली आहे. येणाऱ्या काही दिवसांत राज्य हिस्सा देण्यात येणार असून शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आधी पीक विम्याची भरपाई मिळण्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी अधिवेशनात दिले आहे. 

टॅग्स :पीक विमापीकशेतकरी