Join us

गावरान कोंबडी, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधमाशा पालनासाठीच्या कर्ज मर्यादित मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:44 AM

ड्रॅगनफ्रूट, गाय, म्हैस, शेळी मेंढी युनिट तसेच लेयर कोंबडीसाठी कर्जमर्यादा मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. गावरान कोंबडी, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधमाशा पालनासाठीच्या कर्ज मर्यादित मोठी वाढ करण्यात आली आहे.

सोलापूर : ड्रॅगनफ्रूट, गाय, म्हैस, शेळी मेंढी युनिट तसेच लेयर कोंबडीसाठी कर्जमर्यादा मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आली आहे. गावरान कोंबडी, शेततळ्यातील मत्स्यपालन, मधमाशा पालनासाठीच्या कर्ज मर्यादित मोठी वाढ करण्यात आली आहे.

या कर्जविषयक धोरणाला राज्यस्तरीय टेक्निकल समितीने मान्यता दिल्याने हे कर्ज धोरण जिल्ह्यातील सर्वच बँकांना लागू होणार आहे. २०२४-२५ वर्षांसाठी सर्व प्रकारच्या कर्जाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय टेक्निकल समितीने केलेल्या शिफारशी राज्य समितीने मान्य केल्या आहेत. त्यामध्ये काहींचा कर्ज दर कमी करण्यात आला, काहींचा कर्ज दर आहे तोच तर काहींसाठी कर्ज दरात मोठी वाढ करण्यात आल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पत्रकावरून दिसत आहे.

ड्रॅगनफुटला गतवर्षी हेक्टरी दोन लाख २० हजार कर्ज दिले जात होते. त्यात ४० हजार रुपयांची कपात करून एक लाख ८० हजार रुपये करण्यात आले आहे. गाय कर्ज ३५ हजारांवरून ३० हजार, म्हैस कर्ज दर ३७ हजारांहून ३२ हजार, शेळी-मेंढी युनिट (१०१) एक लाख १० हजाराहून ३५ हजार, लेयर १०० पक्षी ७५ हजारांहून ४७ हजार रुपयाने कमी करण्यात आले आहेत.

गावरान १०० पक्षी २७ हजार रुपयांवरून ४६ हजार ५०० रुपये, प्रति हेक्टर शेततळे मत्स्यपालन ५० हजारांहून ५ लाख रुपये, नदी तलावात ३० हजारांहून ८० हजार, मधमाशी पालन (१० पेट्या) ७६ हजार १८० रुपयाने वाढ करण्यात आली आहे.

सोयाबीनसाठीच्या कर्जदारात कपात

  • खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनचा कर्ज दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. मागील वर्षी सोयाबीन कर्ज दर प्रति हेक्टरी ४९ हजार ५०० रुपये इतका होता. तो कमी करुन ३६ हजार ४०० रुपये म्हणजे ११०० रुपये कमी केला आहे.
  • ज्वारी या प्रमुख पिकासाठी प्रति हेक्टर ११०० रुपयांची वाढ करत २८,६०० रुपये केले आहेत. मकासाठी कर्ज दरात किरकोळ वाढ केली असली, तरी खरिपातील इतर धान्याचे कर्ज दर आहे तेच आहेत.
  • टिश्यू कल्चर उसासाठी हेक्टरी एक लाख १५ हजार, आडसालीसाठी एक लाख ३२ हजार ७०० रुपये, पूर्व हंगामी व सुरू प्रत्येकी सव्वा लाख रुपये कर्ज दर ठरवला आहे. लसूण, हळद, आले, संकरित टोमॅटो, आदींच्या कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.
टॅग्स :शेतकरीबँकखरीपपीक कर्जशेतीपीकसोयाबीनऊसज्वारी