Join us

Crop Insurance : कांद्याचा विमा भरला पण शेतात पीकंच नाही! बोगस पीक विमा अर्जाची पोलखोल

By दत्ता लवांडे | Updated: November 16, 2024 19:11 IST

राज्यामध्ये कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि संबंधित पिकाचे पीक विमा अर्ज यामध्ये तफावत आढळून आल्याने तातडीने उलटतपासणीचे आदेश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले होते.

Pune : यंदाच्या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत झालेला मोठा घोटाळा कृषी विभागाने उघड केला आहे. कांदा पिकाची लागवड न करताच पीक विमा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची उलट तपासणी केली असता बोगस अर्जाचा हा घोटाळा उघड झाला असून कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या प्रयत्नातून सरकारचे कोट्यावधी रूपयांचे होणारे नुकसान टळणार आहे. 

दरम्यान, राज्यामध्ये कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि संबंधित पिकाचे पीक विमा अर्ज यामध्ये तफावत आढळून आल्याने तातडीने उलटतपासणीचे आदेश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले होते. या तपासणीमध्ये कांदा पीक लागवड न करताच पीक विमा काढलेले २० हजार ८०३ बोगस अर्ज आढळून आले आहेत. त्याचे एकूण क्षेत्र हे ११ हजार ७८९ हेक्टर एवढे आहे. 

यामध्ये नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा या तीन जिल्ह्यांचा सामावेश असून नाशिक जिल्ह्यात ५४६,अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार ७४४ आणि सातारा जिल्ह्यात १८ हजार ५१३ बोगस अर्ज आढळून आले आहेत. ११ हजार ७८८ हेक्टरवरील कांदा पिकाचा बोगस पीक विमा काढल्याचं या तपासणीतून निष्पन्न झाले आहे. तपासणीमुळे राज्य शासनाचे ७ कोटी २६ लाख १२ हजार रूपयांची बचत झाली आहे. 

अजूनही ही तपासणी सुरू असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फेरतपासणी सुरू आहे. ज्या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष पिकाखालील क्षेत्र आणि विमा अर्जावरील क्षेत्रामध्ये तफावत दिसत आहे अशा जिल्ह्यांची तपासणी अद्याप बाकी असून अजूनही घोटाळा बाहेर येऊ शकतो.

जिल्हा, बोगस अर्जाची संख्या, बोगस अर्जाखालील क्षेत्र, पीक विम्याची रक्कमनाशिक - ५४६, १ हजार ७७३ हेक्टर, १ कोटी ८७ लाख ७६ हजारअहिल्यानगर - १ हजार ७४४, ७३८ हेक्टर, ३६ लाख ८९ हजारसातारा - १८ हजार ५१३, ९ हजार २७८ हेक्टर, ५ कोटी १ लाख ४६ हजारएकूण - २० हजार ८०३, ११ हजार ७८८ हेक्टर, ७ कोटी २६ लाख १२ हजार

अजून धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड या जिल्ह्यांचा अहवाल येणे बाकी आहे. नाशिक जिल्ह्यातील अहवालही अपूर्ण आहे. कृषी विभागाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे तपासणीसाठी वेळ लागत आहे. लवकरच सर्व जिल्ह्याचा अहवाल प्रसिद्ध होईल.- विनयकुमार आवटे (संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे)

टॅग्स :शेती क्षेत्रपीकपीक विमाशेतकरी