Join us

Crop Damage : वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना 'अशी' मिळते मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 18:44 IST

शासनाकडून नुकसान भरपाईची तरतूद पंचनामा करून रक्कम थेट खात्यात

जवळा : पावसानंतर शेतात तरारलेल्या पिकांवर वन्यप्राण्यांच्या कळपांचे हल्ले वाढले आहेत. हे प्राणी केवळ पिकांची नासधूस करत नाहीत, तर प्रसंगी शेतकऱ्यांवरही हल्ला करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई दिलासादायक ठरत आहे.

अलीकडे वन्यप्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शिवाय काही ठिकाणी पशुधनावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पशुधनाचा मृत्यूही झाला आहे. कधीकधी एखाद्या माणसाचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनाही घडत आहेत. अशावेळी संबंधित कुटुंबासाठी नुकसानभरपाई दिली जाते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

नुकसानभरपाईचे निकष आणि पुरावेशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३३ टक्क्यांहून अधिक शेतीचे नुकसान झाल्यासच नुकसानभरपाई पात्र ठरते. पाहणीदरम्यान पिकांच्या अवस्थेचा पंचनामा केला जातो. यासाठी शेतकऱ्यांनी काही पुरावे सादर करणे आवश्यक असते. आधारकार्ड, बँक खात्याचा तपशील, ७/१२ उतारा, नुकसान झालेल्या शेतीचे फोटो किंवा व्हिडिओ हे महत्त्वाचे पुरावे मानले जातात. या कागदपत्रांच्या आधारे तयार झालेला पंचनामा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो आणि त्यावरून नुकसानभरपाईची रक्कम निश्चित केली जाते.

कर्जत-जामखेडच्या शेतकऱ्यांना साडेनऊ लाखांची मदतकर्जत आणि जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी तब्बल ९ लाख ९९ हजार १८ रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. जामखेडमध्ये २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीत पिकांच्या नुकसानीसाठी मिळून ६४ हजार ५०० तर वन्यजीव नुकसानभरपाई म्हणून ८६ हजार ७५० रुपये वितरित झाले. कर्जतमध्ये याच कालावधीत पिकांच्या नुकसानीसाठी १ लाख ४९ हजार ६१८ आणि वन्यजीव नुकसानभरपाई म्हणून तब्बल ६ लाख ९८ हजार १५० रुपये मंजूर झाले.

पिकांच्या नुकसानीसाठी किती मदत ?नुकसान झालेल्या शेतीची महसूल व वनविभागाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते. शेतकरी किंवा गावातील शेतमित्रांकडून मिळालेल्या कळवणीनंतर तलाठी आणि वनरक्षक शेतात जाऊन पंचनामा करतात. या पाहणीत किती टक्के पिकांचे नुकसान झाले, शेतकऱ्याची माहिती, तसेच फोटो व अन्य पुरावे यांची नोंद केली जाते. तयार झालेला पंचनामा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. शासनाच्या निकषांप्रमाणे त्या अहवालावरून नुकसानभरपाई मंजूर केली जाते आणि ठरलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते.

वन्यप्राण्यांचा हल्ला वाढलामागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बिबट्या, रानडुक्कर, रोही आणि माकड अशा वन्यप्राण्यांनी शेतीचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. हे प्राणी रात्रीच्या वेळी शेतात घुसून उभे पीक तुडवतात आणि खातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

कुठे आणि कशी मागायची दाद ?वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या गावातील तलाठी किंवा वनरक्षकाला कळवावे. यानंतर महसूल व वनविभाग संयुक्त पाहणी करून पंचनामा करतात. शेतकऱ्यांनी सनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरून नुकसानभरपाईची मागणी करावी लागते. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची छाननी केली जाते आणि नुकसानभरपाई मंजूर झाल्यास थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते.

२५ लाखांची मदत वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाकडून त्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यासाठी महसूल व वनविभागाकडून पंचनामा करून अहवाल सादर केला जातो. मृत व्यक्तीच्या कुटुंबाने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर मदत रक्कम मंजूर होते.

पावसाळ्यात पीकं भरभरून आलेली असल्याने नीलगाय, रानडुक्कर, हरिण यांसारखे वन्यप्राणी गावाकडे वळतात. त्यामुळे शेतीचे नुकसान अपरिहार्य ठरते. अशा घटना घडल्यास शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा. नुकसानभरपाई मिळण्यासाठी आम्ही महसूल विभागासोबत संयुक्त पंचनामा करून प्रस्ताव पाठवतो. शासनाच्या नियमांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत दिली जाईल.- मोहन शेळके, वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्जत

नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा. प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेलं नुकसान लपवून न ठेवता, लगेच माहिती दिल्यास पंचनामा जलद होतो आणि नुकसान भरपाईही वेळेत मिळते. वनविभाग व महसूल विभागाची संयुक्त पथके शेतात पाहणी करून अहवाल तयार करतात. त्यानुसार शासनाच्या नियमांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जाते.- रवींद्र घुले, तालुका कृषी अधिकारी, जामखेड

टॅग्स :शेती क्षेत्र