Join us

Cotton Seeds : कापूस बियाणांचे योग्य दर किती? जास्त दराने विक्री होत असल्यास करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 3:34 PM

केंद्र सरकार कापसाच्या बियाणांच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दरनिश्चिती करत असते.

पुणे : खरिपाचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी आता पेरण्या आणि लागवडीची तयारी सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे आता बियाणे खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडून कापूस आणि सोयाबीनच्या बियाणांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

दरम्यान, कापसाच्या बियाणांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूकही शेतकऱ्यांची होताना दिसते. गुजरात आणि आंध्रप्रदेशमधून महाराष्ट्रात छुप्या मार्गाने बोगस बियाणांची आयात होते. या आयातीवर पायबंद ठेवण्यासाठी सरकारकडून काळजी घेतली जाते. पण राज्यांतर्गतही खासगी कंपन्या कापूस बियाणांच्या किंमती वाढवून लावत असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. 

किती आहेत कापसाचे दर?केंद्र सरकारकडून कापसाच्या बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर निश्चित करण्यात येतात. त्यामध्ये BG-1 वाणासाठी ६३५ रूपये प्रती पॅकेट आणि BG-2 वाणासाठी ८६४ रूपये प्रती पॅकेट एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. यापेक्षा जास्त दराने कापसाच्या बियाणांची विक्री होत असल्यास शेतकरी थेट कृषी विभागाकडे यासंदर्भात तक्रार करू शकतात.

कृषी सहाय्यकांच्या निगराणीखाली होणार विक्रीबोगस बियाणे आणि बियाणांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलली जात असून कृषी सेवा केंद्रावर एका कृषी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कृषी सहाय्यकाच्या निगराणीखाली बियाणांची विक्री केली जाणार आहे. 

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी ठराविक किंमतीपेक्षा जास्त किंमत देऊन कापसाच्या बियाणांची खरेदी केली आहे अशा शेतकऱ्यांनी तक्रार केली तर संबंधित कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाणार असून शेतकऱ्यांचे अतिरिक्त पैसे परत मिळण्यासाठी मदत होऊ शकते. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकापूस