Join us

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट लागवड, सहा हजार हेक्टरवर मिरचीची लागवड ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:50 PM

दोन महिन्यांत लागवडीनंतर उत्पन्न निघायला सुरुवात होते. पहिला तोडा कमी निघतो; परंतु दुसऱ्या तोड्यापासून चांगले उत्पन्न होते.

भोकरदन तालुक्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेने उन्हाळी मिरचीच्या लागवडीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. यंदा तालुक्यातील बहुतांश भाग १०० टक्के दुष्काळाने होरपळलेला असूनही शेतकऱ्यांनी मिरची लागवडीसाठी विहिरीत पाणी साठवून ठेवून ठिबक, मल्चिंग सिंचनद्वारे तालुक्यात नगदी पीक म्हणून तब्बल सहा हजार हेक्टरवर उन्हाळी मिरचीची लागवड केली.

दोन महिन्यांत लागवडीनंतर उत्पन्न निघायला सुरुवात होते. पहिला तोडा कमी निघतो; परंतु दुसऱ्या तोड्यापासून चांगले उत्पन्न होते. जून-जुलैमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासते. त्यामुळे यंदा तालुक्यातील शेतकरी मिरची पिकाकडे वळला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आर. एस. भुते यांनी दिली.

जालना जिल्ह्यातील भोकरदन व जाफराबाद हे दोन तालुके मिरचीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मिरची खरेदीसाठी जाफराबाद एक, तर भोकरदन दोन नंबर आहे. या ठिकाणी राज्याबाहेरील व्यापारी मिरची खरेदीसाठी येतात.

माझ्या रोपवाटिकेतून गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने रोपांची बुकिंग झाली आहे. अद्यापही बुकिंगसाठी ऑर्डर येत आहे. आपल्या भागात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. अनेक शेतकरी जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर मिरची लागवड करणार आहेत. -अमोल पवार, रोपवाटिकाधारक

७० हजार खर्च एका एकरसाठी

यंदा ११००० मिरचीच्या रोपांची लागवड केली आहे. जून-जुलैच्या काळात पैसा उपलब्ध नसतो. त्यामुळे एप्रिल-मेमध्ये उन्हाळी मिरचीची लागवड केली जाते. त्यानंतर जून-जुलैमध्ये मिरची तोडायला सुरुवात होते आणि शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैशाची अडचण दूर होते. एका एकरसाठी ७० हजारांपर्यंत खर्च येतो. उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनही चांगले मिळते. - राजेश दळवी, शेतकरी, दानापूर

टॅग्स :मिरचीलागवड, मशागतपोलीस अधीक्षक, जालनाभोकरदन