Join us

Budget 2024 : तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 1:44 PM

देशाला तेलबिया आयात कराव्या लागणार नाहीत असंही मत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलंय

आज केंद्रीय अर्थसंकल्पाचे सादरीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून लोकसभेत करण्यात आले. यामध्ये त्यांनी शेती क्षेत्रासाठी मत्स्यव्यवसाय, तेलबिया यासाठी मोठ्या घोषणा केल्या. तेलबिया उत्पादनात भारत येणाऱ्या काळात आत्मनिर्भर बनण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न केले जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, सोयाबीन, तीळ, मोहरी, शेंगदाणे, करडई, सूर्यफूल, सरकी, एरंड या भारतातील महत्त्वाच्या तेलबिया असून यापासून बनवलेले तेल खाद्यासाठी वापरले जाते. पण त्यामध्ये सोयाबीनपासून बनवलेले तेल सर्वांत जास्त प्रमाणात खाद्यासाठी वापरले जाते. यंदा देशांतर्गत सोयाबीनचे उत्पादन कमी असल्यामुळे सोयापेंडीची आयात सरकारकडून करण्यात आली आहे. तर येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला नाममात्र दर मिळताना दिसत आहे. 

काय म्हणाल्या अर्थमंत्री सीतारामण?

येणाऱ्या काळात तेलबियांमध्ये भारताला सक्षम बनवण्यासाठी तेलबिया आत्मनिर्भर अभियान राबवले जाणार आहे. यामुळे भारतात तेलबियांचे उत्पादन वाढण्यासाठी मदत होईल. परिणामी भारताला बाहेरच्या देशांकडून तेलबियांची आणि उत्पादनांची आयात करावी लागत आहे ते कमी होऊन भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. म्हणजेच भारत येणाऱ्या काळात तेलबियांच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होईल असं मत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.

शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?

भारतातील तेलबियांचे उत्पादन वाढले तर बाहेरून होणारी आयात कमी होईल आणि देशांतर्गत सोयाबीनचे दर टिकून राहतील. सोयपेंड, तेल, सरकी आणि यांपासून बनवलेल्या उत्पादनांची आयात केल्यामुळे अनेकदा देशांतर्गत सोयाबीनचे दर पडतात. पण सोयाबीन उत्पादनामध्ये भारत आत्मनिर्भर झाल्यास देशांतर्गत दर टिकून राहण्यात मदत होईल. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीतेल शुद्धिकरण प्रकल्प