Join us

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! सातारा, सांगली, कोल्हापुरात 'वखार आपल्या दारी' अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 9:52 PM

"महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण" व "साठवणूकीतून समृध्दीकडे" या आश्वासनासह वखार आपल्या दारी अभियान सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात राबविणार

शेतकऱ्यांना शेतमाल साठवून कर्ज मिळण्याची योजना वखार महामंडळाकडून राबवण्यात येते पण राज्यातीव विविध विभाग आणि प्रकल्पांतर्गत सध्या 'वखार आपल्या दारी' हा कार्यक्रम राबवला गेला आहे. या योजनेचा तिसरा टप्पा सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत राबवला जात आहे. या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट,  महिला बचत गट आणि वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

जागतिक बँक अर्थ सहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), कृषि विभाग, आत्मा यंत्रणा (ATMA), महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MSWC), महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. (MCDC), महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) आणि महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान-उमेद (MSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था यांचे संचालक, महिला बचत गटांचे फेडरेशन व शेतकरी बांधवांकरीता "महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण" व "साठवणूकीतून समृध्दीकडे" या आश्वासनांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने "वखार आपल्या दारी अभियानाचा तिसरा टप्पा राज्यातील सातारा, सांगली व कोल्हापूर, या ३ जिल्ह्यात ३ वखार केंद्रांवर राबविण्यात येणार आहे. याच अभियानाचा पहिला टप्पा अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व लातूर या विभागातील १२ जिल्ह्यामध्ये १३ ठिकाणी ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांमध्ये राबविण्यात आला होता.

दुसरा टप्पा सोलापूर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार या ४ जिल्ह्यातील ९ तालुक्यातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आला होता, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील २२ कार्यशाळामध्ये सुमारे १३०० लाभार्थ्यांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला आहे. आता याच अभियानाचा तिसरा टप्पा फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सातारा, सांगली व कोल्हापूर, या ३ जिल्ह्यात ३ वखार केंद्रांवर तीन एक दिवशीय कार्यशाळा (सकाळी १०.०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत) आयोजित करण्यात येणार आहे.

शेतकरी बांधवांनी पिकविलेला शेतमाल साठवणूक करुन शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेअंतर्गत ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कर्ज पुरवठा करणे, शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेला शेतमाल साठवणूक करण्यासाठी त्यांना आकर्षित करणे, महामंडळाकडून शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक केल्यानंतर साठवणूक भाडयामध्ये ५०% सवलत देणे, शेतकरी उत्पादक कंपनी यांना साठवणूक भाडयात २५% सवलत देणे, खरीप व रब्बी हंगामातील सोयाबीन, मका, तूर, हरभरा, गहू, ज्वारी व इतर कडधान्य शेतकरी बांधवांनी सुगीच्या काळात कमी बाजारभावात शेतमालाची विक्री न करता त्या मालाची सुरक्षित साठवणूक करण्यास प्रोत्साहन देणे इ. सेवा सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत वखार विकास आणि नियामक प्राधिकरण (WDRA), एनईआरएल (NERL), Block Chain व इतर आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे देण्यात येणार आहे. जागतिक बँक अर्थसहाय्यित स्मार्ट प्रकल्पांतर्गत विविध कार्यकारी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गटाचे फेडरेशन यांच्या माध्यमातून गोदाम आधारित मुल्यसाखळी निर्मितीचे कामकाज करण्यात येत असून शेतकरी उत्पादक कंपन्या, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवंन्नोनती अभियान (एमएसआरएलएम), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ गोदाम आधारित प्रकल्पांची कृषि विभागांतर्गत कार्यरत आत्मा यंत्रणेच्या सहाय्याने यशस्वी अंमलबजावणी करीत आहे.

याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळांतर्गत राज्यात गोदाम आधारित पुरवठा साखळ्यांची निर्मिती व बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने गोदाम पावती योजनेची प्रचार व प्रसिध्दी व्हावी या उद्देशाने "वखार आपल्या दारी" या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती कार्यशाळांचे आयोजन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळातर्गत करण्यात येत आहे.

सदर एकदिवसीय कार्यशाळेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्थांचे सभासद, संचालक शेतकरी बांधव, व्यापारी, उद्योजक व महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन यांचा समावेश करण्यात येणार आहे. एकदिवसीय कार्यशाळेमध्ये चहा, दुपारचे जेवण देण्याचे नियोजन करण्यात येणार असून या कार्यशाळेसाठी तज्ञ प्रशिक्षक, शेतकरी बांधवांना निमंत्रित करणे व प्रशिक्षणाच्या अनुषंगाने संपूर्ण कार्यशाळा नियोजनाचे कार्य महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाद्वारे करण्यात येणार आहे.

एकदिवसीय कार्यशाळा विनामुल्य असून शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था व महिला बचत गटांचे फेडरेशन यांचे शेतकरी सभासद, संचालक व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे अपेक्षित आहे. जिल्हयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक, आत्मा यांचे अंतर्गत कार्यरत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (बी.टी.एम.) व सहाय्यक व्यवस्थापक (ए.टी.एम.) शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक व सभासद उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ६६ वर्षापासून शेतमालाची साठवणूक शास्त्रशुध्द पध्दतीने करीत असून शेतकऱ्यांना फक्त ९% द.सा.द.शे. दराने शेतमाल तारण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रु. ५ लाखापर्यंत व शेतकरी उत्पादक कंपन्यांना रु.७५ लाखापर्यंत शेतमाल कर्ज तारण रक्कम उपलब्ध करून देण्यात येत आहे. या अभिनव शेतमाल तारण कर्न योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने १ ते २४ तासात त्यांच्या खात्यावर कर्ज रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून जमा करण्यात येते. शेतकरी ठेवीदारास कर्जाची परतफेड ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून सन २०२२-२३ पर्यंत सुमारे २२९.९३कोटीचे कर्ज या पध्दतीने वितरीत करण्यात आले आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये केंद्र शासनाने हमीभाव योजने अंतर्गत वखार महामंडळाकडे २७ जिल्हयामध्ये १३३ वखार केंद्रावर ३.९२ लाख शेतकऱ्यांचे ७.४७ लाख मे.टन हरभऱ्याची विक्रमी साठवणूक केली आहे.

शेतमाल साठवणूकीसाठी शेतकऱ्यांकरीता २५% जागा आरक्षित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ७/१२ वर आधारित शेतमाल साठवणूकीवर वखार भाड्यात ५०% सवलत देण्यात येत असून शेतकरी उत्पादक कंपन्यांना वखार भाडयात २५% सवलत देण्यात येत आहे. साठवणूक केलेल्या शेतमालास १००% विमा संरक्षण देण्यात येत असून शेतमाल किंमतीच्या/मुल्यांकनाच्या ७०% रक्कम तारण कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा तारण कर्ज योजनेमुळे शेतकऱ्याची शेतमाल साठवणूक दरम्यानची पैशांची तातडीची निकड पूर्ण भागविता येत असल्याने शेतकरी वर्गाकडून सदर योजनेस भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्रामध्ये वखार महामंडळाची २०६ ठिकाणी वखार केंद्रे कार्यरत असून १३३३गोदामाचे जाळे व एकूण साठवणूक क्षमता २३.३५ लाख मे.टन उपलब्ध आहे. शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन, शेतकरी उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजनेचा पुरेपुर उपयोग करून शेतमाल तात्काळ न विकता वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाची शास्त्रशुध्द पध्दतीने साठवणूक करून आपले उत्पन्न वाढवावे तसेच वखार आपल्या दारी अभियानातील कार्यशाळाना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी