Join us

Agriculture Department : कृषी विभागातील दोन संचालक होणार निवृत्त! कुणाची लागणार वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 3:25 PM

विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक निवृत्त झाल्यानंतर त्या जागेवर अद्याप दुसऱ्या संचालकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.

पुणे : राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या कृषी विभागातील दोन संचालक या महिन्यात निवृत्त होत आहेत. यामुळे कृषी विभागातील तीन पदे रिक्त होणार आहेत. दरम्यान, सध्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक पद रिक्त आहे. या पदाचा कारभार सध्या संचालक विकास पाटील हे पाहत आहेत. 

दरम्यान, राज्याच्या कृषी विभागामध्ये विस्तार प्रशिक्षण विभाग, आत्मा विभाग, फलोत्पादन विभाग, प्रक्रिया व नियोजन विभाग, मृदसंधारण विभाग आणि निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग असे विभाग असून प्रत्येक विभागासाठी एक संचालक आहे. मागच्या महिन्यामध्ये विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे सेवानिवृत्त झाले आहेत. या विभागाचे काम सध्या निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील हे पाहत आहेत.

तर ३१ मे या दिवशी आत्मा विभागाचे संचालक दशरथ तांभाळे आणि प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक सुभाष नागरे हे दोन संचालक निवृत्त होत असून त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

संचालकांच्या नियुक्त्या आणि पदोन्नती ही मंत्रालय पातळीवरून केली जाते. तर जेष्ठता यादीनुसार विभागीय सहसंचालकांना संचालकपदाचा मान दिला जातो. त्यामुळे जेष्ठता यादीनुसार सर्वांत जास्त वय असणाऱ्या विभागीय सहसंचालकांना संचालकपदी नियुक्त केले जाणार असल्याच्या चर्चा आहेत. 

कुणाची लागणार वर्णी?सध्या राज्यामध्ये अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे आणि कोल्हापुरचे कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांचे नाव चर्चेत आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी