Join us

Agri. Minister : "मी कृषी विभागातील बदल्यांमध्ये हस्तक्षेप करणार नाही, बदल्यांचे अधिकार आयुक्तांना"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:35 IST

आज पुण्यातील बालेवाडी येथे महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळा पार पडली.

Pune : आपल्याला शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले काम करायचे आहे. त्यामुळे मी अगदी छोट्या कामात लक्ष घालणार नाही. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आम्हाला राहणार नाहीत असं मी कृषी आयुक्तांना सांगितलं असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी कार्यक्रमात बोलताना दिली. यासोबतच फक्त विभागातील १ ते २ टक्के बदल्यांचे अधिकार आम्हाला राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, आज पुण्यातील बालेवाडी येथे महाराष्ट्रात प्रथमच राज्यस्तरीय कृषी अधिकारी कार्यशाळा पार पडली. यामध्ये कृषी मंत्री, कृषी विभागाचे प्रधान सचिव आणि आयुक्तांपासून कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी शेतीतील तंत्रज्ञान, गटशेती, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी विस्तार या विषयावर कार्यशाळा आणि मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी विभागात बदल्यांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार थांबावा आणि अधिकाऱ्यांना बदल्यांसाठी मंत्रालयात चक्कर मारावी लागू नये यासाठी बदल्यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण केले जाईल अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. गट क व गट ड च्या बदल्या आयुक्तांकडून केल्या जाणार आहेत. यासोबतच गट अ व गट ब च्या बदल्यांचे अधिकारसुद्धा सचिव आणि आयुक्तांना दिले आहेत. माझ्याकडे मी बदल्यांचे कोणतेही अधिकार ठेवणार नाही, अगदी अपवादा‍त्मक परिस्थितीत मी लक्ष घालेन असंही ते म्हणाले. 

कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात एक मार्गदर्शक प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये सेवाजेष्ठता, कामाची गुणवत्ता, अनुभव, विभागाची गरज इत्यादी गोष्टींचा विचार करून मार्गदर्शक प्रणाली विकसित केली जाणार आहे. नियमितपणे आणि राजकीय  हस्तक्षेप कमी ठेवूनच विभागात बदल्या केल्या जातील अशी माहिती कृषीमंत्र्यांनी कार्यक्रमात बोलताना दिली आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्र