Join us

शेतकऱ्याचे थकवले २.१५ कोटी, शेवटी वसुलीही अडत्याच्याच गाळा लिलावातून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 11:03 AM

शेतकऱ्यांना २० टक्के रक्कम परत, बाजार समितीचा पुढाकार

टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकऱ्यांकडून ते खरेदी करून सव्वादोन कोटी रुपये थकविणाऱ्या नाशिकबाजार समितीतील एका आडतदाराच्या गाळ्याचा लिलाव करून बाजार समितीने त्यापोटी ४४ लाख रुपये वसूल केले असून, आडत्याकडे पैसे थकलेल्या ४५ शेतकऱ्यांना सुमारे २० टक्के परत केले आहेत.

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे इन्कलाब व्हेजीटेबल कंपनी प्रोप्रायटर नौशाद फारुकी, समशाद फारुकी यांना टोमॅटो विभागात गाळा क्र. १५१ हा ९९ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेला होता. परवाना घेऊन टोमॅटो या शेतमालाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. या आडत्याने जिल्हाभरातील जवळपास १९६ शेतकऱ्यांकडून टोमॅटो हा शेतीमाल वेळोवेळी घेतला आणि त्यांची शेतीमाल विक्रीची जवळपास दोन कोटी रुपये रक्कम थकवली. याबाबत अनेकदा मागणी करूनही शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळत नव्हती. 

प्रशासकीय काळात त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन सभापती देवीदास पिंगळे यांनी सदर आडत्याचा बाजार समितीतील गाळ्याचा जाहीर लिलाव ठेवला होता. या गाळ्याचा लिलाव ४४ लाख रुपयांना करण्यात आला. या वसूल झालेल्या रकमेच्या वाटपासाठी गुरुवारी (दि. १७) शेतकऱ्यांना आवश्यक दस्तऐवजांसह बाजार समितीत बोलविण्यात आले होते. त्यानुसार जवळपास ४५ शेतकऱ्यांना धनादेश आधारे २० टक्के रक्कम देण्यात आली आहे, याचप्रमाणे उर्वरित शेतकऱ्यांना देखील देण्यात येणार आहे.

 यावेळी सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक संजय तुंगार, तानाजी करंजकर, विनायक माळेकर, जगन्नाथ कंटाळे, प्रल्हाद काकड, हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, व्यापारी प्रतिनिधी जगदीश अपसुंदे तसेच मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पवार उपस्थित होते.

"शरदचंद्रजी मार्केट यार्डातील टोमॅटो विभागातील आडते नौशाद फारुकी व समशाद फारुकी यांनी जवळपास १९६ शेतकऱ्यांचे दोन ते सव्वादोन कोटी रुपये थकविले आहेत. यापैकी बाजार समिती सभापती संचालक मंडळाने पुढाकार घेत थकीत रक्कम पैकी २० टक्के रक्कम परत मिळवून दिली आहे.' मात्र, बाजार समिती प्रशासकीय काळात आम्ही तक्रार केली होती. त्यावेळी योग्य कारवाई न करणाऱ्या अधिकारी यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी. तसेच फरार आडते फारुकी शोध घेत शासन व बाजार समिती प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तरीत्या न्याय मिळवून द्यावा." - सागर गायकवाड, शेतकरी, मखमलाबाद

 

टॅग्स :शेतकरीबाजारनाशिकबाजार समिती वाशिमपीक