Join us
Daily Top 2Weekly Top 5

परभणी कृषी विद्यापीठातील १,७८७ एकर पडीत जमीन वहती खाली आणली

By बिभिषण बागल | Updated: August 16, 2023 15:58 IST

शेतकरी बांधवामध्‍ये विद्यापीठ बियाण्‍यास मोठी मागणी असुन यावर्षी विद्यापीठातील १,७८७ एकर पडीत जमीन वहती खाली आणली असुन विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याचे लक्ष आहे.

देशाने मागील ७६ वर्षात विज्ञान, तंत्रज्ञान, कृषि, कला, क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आज देश अन्‍नधान्‍य उत्‍पादनात स्‍वयंपुर्ण झाला असुन इतर देशांना अन्‍नधान्‍य पुरवठा करित आहे. अन्‍नधान्‍य, भाजीपाला, फळ उत्‍पादनात जगात आघाडीवर आहे. हे सर्व शेतकरी बांधवांची मेहनत आणि समर्पण मुळेच शक्‍य झाले, त्‍यास विज्ञान आणि संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाची जोड लाभली. देशाला विकसित व आत्‍मनिर्भर राष्‍ट्र म्‍हणुन दर्जा मिळुन देण्‍याकरिता, समृध्‍द समाज घडविण्‍याकरिता सर्वांनी कार्य करण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७७ वा स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी मा. श्रीमती जया इन्‍द्र मणि, श्री. सौमित्र मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्री. एन. एम. लांडगे, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्या डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या, देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व महान व्यक्तींच्या स्‍मृतीचे स्‍फुरण आपण केले पाहिजे. आज आपला देश भक्कम पायावर उभा आहे. हे साध्य करण्यासाठी अनेकांनी झोकून दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यात महाराष्ट्राच्या पवित्र भूमीचे मोठे योगदान आहे. सर्व कृषी शास्त्रज्ञ, शिक्षक, देशातील कृषी विद्यापीठांचे पदवीधर यांनी प्रत्येक वेळी शेतकरी व समाज हिताचा विचार केला पाहिजे.

शेतकरी बांधवाच्‍या कल्‍याणाकरिता आपण सर्वजण ए‍कत्रितरित्‍या प्रयत्‍न करू या. शेतकरी बांधवामध्‍ये विद्यापीठ बियाण्‍यास मोठी मागणी असुन यावर्षी विद्यापीठातील १,७८७ एकर पडीत जमीन वहती खाली आणली असुन विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याचे लक्ष आहे. मोठे शेततळे तयार करण्‍यात येऊन ९ कोटी लिटर पाणी साठवण्‍याची क्षमता निर्माण करण्‍यात आली आहे. देश व विदेशातील एकविस विविध नामांकित संस्‍थेसोबत शिक्षण व संशोधनाकरिता सामंजस्‍य करार करण्‍यात आले असुन विविध विद्यार्थ्‍यांना वसतीगृह व मुलभुत सुविधा पुरविण्‍याचा प्रयत्‍न विद्यापीठाचा असल्‍याचे असे ते म्‍हणाले.

यावेळी राष्‍ट्रीय छात्र सैनिकांनी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्‍या नेतृत्‍वात माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 

टॅग्स :शेतीशेतकरीविद्यापीठपीकपेरणीपरभणी