धामणगाव आवारी : फुगे घ्या फुगे..केसांवर फुगे..हे आपल्याला सर्वज्ञात आहे मात्र पिल्लं घ्या पिल्लं.. केसावर कोंबडीची पिल्लं हि हाकाटी जेव्हा ग्रामीण भागातून ऐकायला येते तेव्हा नक्कीच याकडे लक्ष वेधते.
केसांवर कोंबडीची पिल्ले विकण्याची अशी हाकाटी आता ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गाव परिसरात हे दिसून आले. याबाबत आमचे धामणगाव आवारी येथील प्रतिनिधीने भेट घेवून त्याच्या या फंड्या बाबत जाणून घेतले.
कोणताही व्यवसाय करताना त्यातून आपल्या पदरात काय पडेल असे नवनवीन फंडे दारावर येणारे,गावांतून फिरणारे फेरीवाले शोधून काढत आहेत.
आता केसांवर फुगे हे आपण ऐकलंय मात्र केसांवर कोंबडीची पिल्ल विक्री करणारा धामणगाव आवारी परिसरातील वाड्यावस्त्यांवर नुकताच फिरताना दिसला. त्याचे नाव रिजवान काकर.
मोटारसायकलच्या क्यारेज भागावर बांधलेली बंदिस्त मोठी चटईची टोपली आणि त्यात चिवचिवणारी कोंबडीची पिल्ले. जिवंत पिलांच्या तुलनेत केसांना चांगला भाव मिळतो.
त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना नको असलेले केसाचे पुंजके आणि त्यांना गरजेचे असलेल्या कोंबड्या हे लक्षात घेऊन आपण थेट केसावर कोंबडीची पिल्ले विकत आहोत आणि ते आपल्याला परवडते असे रिजवान सांगत होता.
सुमारे दोन मूठ केसांच्या पुंजक्यावर कोंबडीची दोन पिल्ल देतो,भंगारावर मात्र पिल्ले देत नाही केसाला प्राधान्य आणि नंतर जुने बंद पडलेले मोबाईल यावर सुद्धा पिल्ले देतो असे तो सांगत होता.
ग्रामीण भागात डोक्यावर कोंबडीच्या पिल्लांचे डाले घेवून येणारे विक्रेते आपण पाहतो मात्र आता केसांवर कोंबडीचे पिल्ले विकण्याचा रिजवान काकर सारख्या फेरीवाल्यांचा हा फंडा त्याच्या व्यवहार कौशल्याचा भाग वाटतो.
व्यवसायाचे त्याने जुळविलेले गणित आपल्याला जरी वेगळे वाटत असले तरी त्यातून या रिजवानने साधलेले आर्थिक गणित महत्वाचे वाटते.
रोज मला ५०० ते ६०० कोंबडीची पिल्ले विक्री करण्यासाठी ३०० ते ३५० ग्रॅम केस मिळतात. अर्थातच हे महिलांच्या डोक्याचे लांब केस असतात. यातून आपल्या मोटारसायकलचे पेट्रोल आणि रोजंदारी सुटते. कोंबडीच्या १०० पिल्लांची एक पेटी असते. ही पिल्ले तेलंगणा, हैद्राबाद येथून येतात. - रिजवान काकर, पिल्ले विक्रेता
अधिक वाचा: Lakhpati Didi : लखपती दीदींची शेवगा, कढीपत्ता चटणी झाली फेमस; वाचा सविस्तर