Join us

हिवाळ्यात कुक्कुटपालनातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 4:54 PM

विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावे लागतात.

विशेषतः कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावे लागतात. कोंबड्यामध्ये विषाणूजन्य, जिवाणूजन्य, प्रजिवजन्य, पोषण तत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अॅफ्लाटॉक्सीकोसीस व इतर विषबाधा आढळतात.

कुक्कुटपालनामध्ये आजार प्रादुर्भावामुळे कोंबड्यामध्ये वजन घटणे, पक्षांचा मृत्यू होणे अशा समस्यामुळे कुक्कुटपालकाचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. म्हणून कोंबड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी रोगनियंत्रण उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हिवाळ्यातील रोग नियंत्रणासाठी उपाययोजनाबऱ्याचदा हिवाळ्यामध्ये  हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी पक्षी जास्त प्रमाणात खाद्य खातात. यामुळे खाद्यावरील खर्च जास्त होतो तसेच ऊर्जा तयार करण्यासाठी न लागणारी पोषणतत्वे वाया जातात.

त्याकरिता खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी व खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी ऊर्जायुक्त खाद्य पदार्थ जसे तेल, स्निग्ध पदार्थ, प्रथिने यांचे खाद्यातील प्रमाण वाढवावे व इतर पोषणतत्त्वांचे प्रमाण तितकेच ठेवावे. शेडमध्ये दोन्ही बाजूच्या जाळ्यांना पडदे लावावेत. हे पडदे रात्री व पहाटे थंड हवेच्या वेळी बंद करावेत. दुपारी थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत. शेडमधील तापमान विजेचे बल्ब, शेगडी किंवा ब्रुडरच्या साहाय्याने वाढवावे.

अधिक वाचा: कुक्कुटपालनात सुधारित ग्रामप्रिया कोंबड्या ठरत आहेत फायदेशीर

लोडशेंडींगच्या काळात शेडमधील तापमान वाढविण्याकरिता तातडीची सुविधा म्हणून जनरेटर, बॅटरीची सोय करावी. मुक्त शेडमध्ये कोंबड्यांना पूरक खाद्य द्यावे. जेणेकरून पोषणतत्वांची कमतरता होणार नाही. पक्षांना पिण्यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून खाद्य खाण्याचे प्रमाण वाढून कोंबड्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकवण्यास मदत होते.

बऱ्याचवेळा शेडमध्ये पाणी सांडून गादी साहित्य ओले झाल्यास व शेडमधील आर्द्रता वाढल्यास गादी साहित्यामध्ये जंताची अंडी तयार होते. अशावेळी प्रत्येक तीन महिन्याला जंतनिर्मूलन करणे फायदेशीर ठरते तसेच गादी साहित्य नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. कोंबड्यासाठी शेड तयार करताना कोंबड्यांचे प्रत्येक ऋतुमध्ये योग्य व्यवस्थापन करता येईल, असे नियोजनपुर्वक शेड तयार करावे.

तसेच शेडमध्ये हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी. ठरवून दिल्याप्रमाणे कोंबड्यांना नियमित लसीकरण करून घ्यावे. अधिक माहितीसाठी जवळच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा. ज्या ज्या वेळी हवामानात अचानक बदल होऊन पक्षांवर ताण येतो, त्यावेळी पक्षांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व 'ब' जीवनसत्वाचा वापर करावा, जेणेकरुन पक्षावरील ताण कमी होईल.

डॉ. जी. यु. काळुसे व डॉ. एस. यु. नेमाडेकृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ

टॅग्स :शेतकरीशेतीव्यवसायबर्ड फ्लू