- अरुण राजगिरे
Youth Fish Farming : काहीतरी वेगळं करून दाखवायचं ठरवलं आणि यश मिळालं' ह्या उक्तीप्रमाणे देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील शुभम गोविंद नागपूरकर यांनी मत्स्यपालन व्यवसायात यश मिळविले आहे.
कृषी पदवीधर असलेले शुभम यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अभ्यास करून स्वमालकीच्या नैसर्गिक तलावात मत्स्यपालनाचे यशस्वी मॉडेल उभे केले. वर्षाला चार ते पाच लाख रुपयांचा नफा त्यांना मिळत आहे.
शुभम नागपूरकर यांच्या शेतजमिनीतील तलाव नैसर्गिक रचनेत आहे. या तलावाला वापरात आणण्याचे शुभम यांनी ठरविले. त्यांनी योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन घेतले. निरीक्षण करून तलावाचा व्यावसायिक उपयोग केला. शुभम यांनी मत्स्यबीजाच्या आरोग्यदायी वाणांची निवड करून त्यांचे संगोपन केले.
यात कार्प, कतला, रोहू, अमेरिकन गोल्ड ह्या वाणांचा समावेश आहे. व्यावसायिक मागणी असलेल्या जातींचे नियोजनबद्ध पालन केल्यामुळे त्यांना दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेतील मागणीनुसार ते थेट ग्राहकांना विक्री करतात. यामुळे मध्यस्थांवर होणारा खर्च नफ्यामध्येच परावर्तित होतो.
असे आहे व्यवस्थापनशुभम हे दरवर्षी एक लाख रुपयांचे मत्स्यबीज खरेदी करतात. तलावात मत्स्यबीज टाकून त्यांच्यावर देखरेख ठेवतात. माशांकरिता हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी १५ ते २० ट्रॉली शेणखत टाकतात. मासे पकडण्याचे काम चोप येथील कहार समाजबांधवांना देतात. या समाजातील काही नागरिकांना दोन ते तीन 3 महिने ते रोजगार देतात. मत्स्यबीज, चारा व मासे पकडण्यासाठी लागणारा खर्च वगळून शुभम यांना वर्षाचे चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळतो.
जिद्द हवी, आत्मनिर्भर होता येतेशुभम यांनी कृषीचे शिक्षण घेतले आहे. नोकरीच्या मागे न धावता त्यांनी कृषीपूरक व्यवसाय सुरू केला. त्यांची यशोगाथा केवळ व्यवसायापुरती मर्यादित नाही, तर तरुणांसाठी प्रेरणा देणारी आहे. नोकरी मिळण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा स्वतःहून एखादा व्यवसाय सुरू केल्यास व त्यासाठी मेहनत घेतल्यास मिळणाऱ्या नफ्यातून आत्मनिर्भर होता येते, हे सांगताना शुभम यांचा उर भरून येतो.